गोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बघोली येथील मुनेश्वर ऊर्फ मुन्ना शेषराम पारधी (३५) यांचा २० नोव्हेंबरच्या रात्री कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. पतीच्या खुनाचा कट पत्नीनेच रचला होता. आपल्या प्रियकरासोबत कट रचून नवऱ्याला यमसदनी पाठविणाऱ्या पत्नीला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी २४ तासात अटक केली.
२० नोव्हेंबरच्या रात्री मुनेश्वर ऊर्फ मुन्ना शेषराम पारधी (३५, रा. बघोली, ता. तिरोडा) हा आपल्या घरी पत्नी व मुलांसह झोपला होता. मृतकाची पत्नी शारदा मुनेश्वर पारधी (३०) हिने तिचे नातेवाईक व फिर्यादी प्रदीप बाबुलाल बघेले यांना २१ नोव्हेंबरच्या पहाटे ३.३० वाजता फोन करून घरी बोलावले. ते त्याच्या आईसह मुनेश्वरच्या घरी गेले.
यावेळी मुनेश्वरच्या डोक्यावर कुऱ्हाडीच्या जखमा आढळून आल्या. तो बेशुध्द स्थितीत मिळून आल्यामुळे प्रदीप बघेले यांनी डॉक्टरांना बोलावून त्याची तपासणी केली असता तो मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणात दवनीवाडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांनी आरोपीचा शोध घेऊन तत्काळ गुन्हा उघड करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार दवनिवाडा पोलीस ठाण्याचा एक चमू व स्थानिक गुन्हे शाखेचा दुसरा चमू असे दोन चमू गठित करण्यात आले.
मुन्नाच्या पत्नीने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुणाल मनोहर पटले (२२, रा. बघोली) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या दिशेने तपास यंत्रणेने तपास केला असता मृतकची पत्नी शारदा मुनेश्वर पारधी व कुणाल मनोहर पटले यांचे अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. त्यांच्या अनैतिक संबंधाबाबत मृतकास माहिती झाली होती. त्यामुळे आरोपीने मनात राग बाळगून तसेच मृतकाच्या पत्नीसोबत संगनमत करून मुनेश्वर ऊर्फ मुन्ना शेषराम पारधी याला ठार करण्याचा चंग बांधला.
२१ नोव्हेंबरच्या पहाटे ३.३० वाजता शारदा मुनेश्वर पारधी व कुणाल मनोहर पटले या दोघांनी कुऱ्हाडीने डोक्यावर मारून मुन्नाला ठार केले. त्या दोन्ही आराेपींना २१ नोव्हेंबर रोजी रात्री ११.२४ वाजता अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत.