गोरेगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत येणाऱ्या ग्राम गिधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (दि.१८) कोव्हॅक्सिनचा पहिला डोस लावण्यासाठी लसीकरण केंद्र लावण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतच्या माजी सदस्य अनुसया केवलचंद पारधी (६२) यांना आरोग्य सेविका मेश्राम यांनी एकापाठोपाठ दोन डोस दिले. या महिलेची प्रकृती सामान्य आहे, पण १५ दिवसांनंतर परिणाम दिसणार अशा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलगा विजय पारधी घाबरला असून, पोलिसांत तक्रार करण्याची तयारी दाखविली आहे.
कोविड-१९ च्या बचावाकरिता सरकारने ज्यांचे वय ४५ ते ६० वर्षे आहे अशा नागरिकांकरिता लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत येणाऱ्या ग्राम गिधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (दि.१८) दुपारी ३ वाजता लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले होते. यात गावातील महिला-पुरुष जिल्हा परिषद शाळेत एकत्र आले होते. लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतच्या माजी सदस्य अनुसया पारधी यांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आल्यानंतर त्यांना शाळेतच थांबण्याचा सल्ला आरोग्य सेविका मेश्राम व तिलकवार यांनी दिला. त्यामुळे अनुसयाबाई शाळेत थांबल्या असता १० मिनिटांनी पुन्हा त्यांना आरोग्य सेविका मेश्राम यांनी बोलावून दुसरा डोस देण्याची तयारी केली. अनुसयाबाईंनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे असे सांगितले, मात्र याकडे दुर्लक्ष करीत आरोग्य सेविकेने दुसरा डोस लावला. थोड्यावेळाने अनुसयाबाईंनी घरी जाऊन मुलगा विजय पारधी यास माहिती दिली.
विजय पारधी यांनी शहानिशा करण्यासाठी हाताच्या खाद्यांची पाहणी केली असता इंजेक्शनचे दोन चिन्ह उमटलेले दिसले. त्यांनी शाळेत जाऊन यासंदर्भात आरोग्य सेविका मेश्राम यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले नाही. पण वरिष्ठांना यासंदर्भात माहिती दिली. अनुसयाबाईंची प्रकृती स्थिर आहे की, काही वाईट परिणाम झाले का याची चाचपणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चोपाचे वैद्यकीय अधिकारी व पथक पारधी यांच्या घरी गेले व तपासणी करून प्रकृती स्थिर असल्याचे सांगत मुख्यालयी परत गेले. लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर १५ दिवसांत प्रतिकारशक्ती वाढण्यास सुरुवात होत असते. अनुसयाबाईंना एकाच वेळी दोन डोस आरोग्य सेविकेने लावल्याने काय परिणाम होईल याची भीती मुलगा विजय पारधी यांना आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य सेविकेवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच १५ दिवसानंतर कोणते वाईट परिणाम होतात यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करणार, अशी माहिती विजय पारधी यांनी दिली आहे.