नवेगावबांध : झोपडीवजा जीर्ण झालेले घर कोसळून त्याखाली दबून महिला जखमी झाली. येथे शनिवारी (दि. २०) मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, मागील तीन वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुंभरे कुटुंबीयांना घरकुल न मिळाल्याने ही योजना कितपत यशस्वी ठरत आहे हे यातून दिसून आले.
येथील प्रभाग क्रमांक-६ मधील रहिवासी वच्छला गोपीचंद कुंभरे (वय ६५) या दोन मुले, सून, दोन नात अशा सहाजणांसह आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहतात. घरातील सर्व गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री १.३० वाजतादरम्यान त्यांचे घरच कोसळले. घराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांनी एकच आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले व त्यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले. यात वच्छलाबाईंची सून उर्मिला हिच्या डोळ्याला, हाताला व पायाला इजा झाली आहे. त्यांना रात्रीच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कुंभरे कुटुंबीय मागील तीन वर्षांपासून घरकुलच्या प्रतीक्षेत असून, यामुळेच ते तुटक्या-फुटक्या झोपडीवजा घरात वास्तव्य करीत आहेत. असे कितीतरी कुटुंबीय आजही अशाच घरांमध्ये आहेत. अधूनमधून अवकाळी पावसाचा धोका आहेच. आम्ही अडाणी असल्यामुळे कागदपत्रांचा पाठपुरावा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला तीन वर्षांपासून अजूनही घरकुल मिळाले नाही, अशी खंत वच्छलाबाई यांनी व्यक्त केली आहे. तर प्रभाग क्रमांक-६ मधील नागरिकांनी अत्यंत गरजू लोकांना घरकुल मिळण्यास विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने १०० अत्यंत गरज असलेल्या लोकांची यादी पाठविली आहे. पूर्वी संगणीकृत झालेल्या (अ) यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मिळणार. त्यानंतर ब, क, ड यादीतील गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळतील अशी प्रशासकीय व्यवस्था आहे. अत्यंत गरजूंना ताबडतोब घरकुल देता येत नाही असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येते. कुंभरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत तातडीने करेल असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी सांगितले आहे.
------------------------
देव तारी त्याला कोण मारी
कुंभरे यांचे घर पडल्याने त्याखाली घरातील सर्वच सदस्य दबले गेले होते. यात उर्मिला यांना मारही लागला आहे. मात्र, या ढिगाऱ्यात दबलेली साडेतीन महिन्यांची पूर्वी व अडीच वर्षांची तृप्ती या वच्छलाबाईंच्या दोन्ही नातींना काहीच झाले नाही व त्या सुखरूप बाहेर निघाल्या. नशीब बलवत्तर म्हणूनच या दुर्घटनेतून त्या सुखरूप बचावल्या असून, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.