माधुरी नासरे : पुनर्वसन व शैक्षणिक प्रवाहात आणणार लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव-बोंडगाव येथील जन्मदात्या माय-बापांचे छत्र हरपलेल्या त्या चार अनाथ निरागस लेकींची जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाने गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्षात अधिकारी वर्ग त्यांच्या झोपडीवजा दारामध्ये बुधवारी (दि.१४) धडकले. केश कर्तनाचे काम करून घराचा गाडा चालविणाऱ्या निमगाव येथील ४० वर्षीय अनिल सुदाम सूर्यवंशी हा पत्नी मंगला (३६) व मोहीणी (१७), स्वाती (१५), जोत्सना (१०), टिष्ट्वंकल (८) या चार मुलींसोबत राहत होता. अचानक एके दिवशी घरचा करता पुरुष असलेला अनिल यांची प्रकृती एकाएकी खालावली व २३ एप्रिल २०१७ रोजी अनिलची प्राणज्योत मालवली. त्यापाठोपाठ १९ मे रोजी ध्यानीमनी काहीही कल्पना नसताना मंगला यांची एकाएकी प्रकृती गंभीर स्वरुपाने खालावली. कोणताही औषधोपचार करण्याची दैवाने संधी न देता मंगला हिने देह त्यागला. मागे पुढे २५ दिवसांच्या फरकाने जन्मदात्या माय-बापाचे एकाकी छत्र हरपल्याने त्या चारही बहीणी अनाथ झाल्या. एकाकी पडल्या हसण्या बाळगण्याच्या वयात मायबापाची साथ सोडून गेल्याने पुढील आयुष्य त्या ४ बहिणीनी कसे व्यथित करायचे असा गंभीर प्रश्न सूर्यवंशी कुटूंबावर पडला. मायबापाचे छत्र हरवून अनाथ झालेल्या त्या चारही बहिणींची व्यथा वेळोवेळी ‘लोकमत’ ने मांडून मदतीचे आवाहन केले होते. मानवी मनाला वेदना देऊन सहानुभूती निर्माण करणाऱ्या बातम्यानी सामाजिक दानदाते पुढे आले. त्या बातमीची दखल घेऊन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे संबंधीत अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा ताफा थेट त्या चार अनाथ बहिणींच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी निमगाव येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी (१४) येवून ठेपला. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. माधुरी नासरे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी सुहास बोंदरे, समाजिक कार्यकर्ता मुकेश पटले, सरंक्षण अधिकारी प्रवीण वाकडे, गजानन गोबाडे यांनी चारही अनाथ बहिणींची भेट घेतली. डॉ. नासरे यांनी त्यांची हकीकत जाणून घेतली. बाल न्याय (काळजी व सरंक्षण) अधिनियम २००० (२००६) व सुधारीत अधिनियम २०१५ अन्वये काळजी व सरंक्षणाची गरज असणाऱ्या ० ते १८ वयोगटातील बालकांना पूनर्वसन करणे तसेच त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, सर्वागिण विकास घडविणे, बालकांना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी सोयी सवलती पुरविण्याचे काम बालविकास विभागाअंतर्गत बाल कल्याण समिती व जिल्हा बालसरंक्षण अधिकारी कक्षाच्या समन्वयाने बालकाच्या काळजी व संरक्षणाचे कार्य निरंतरपणे करीत असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. चारही बहिणीचे संगोपन व शैक्षणिक कार्याची जबाबदारी विभागाच्यावतीने घेतली जाईल, त्यांनी त्यांच्या घरातील काका, आजा व आजींच्या समक्ष सांगीतले. आपण संमती दिली तर बहिणीच्या संगोपनाची दखल घेऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी पो.पा. संजय कापगते, माधोराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता आनंद गायकवाड, प्रा. माधव चचाणे, मुलीचे काका बबन सूर्यवंशी उपस्थित होते.
महिला व बालविकास विभागाचे अधिकारी ‘त्यांच्या’ घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2017 1:06 AM