तहसील कार्यालयावर धडक : आंदोलनाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : आमगाव खुर्द (सालेकसा) येथे दारूबंदीसाठी मागील अनेक दिवसांपासून गावातील महिला निवेदने, ग्रामसभा, मोर्चे आदी उपाय करीत आहेत. परंतु महिलांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमगाव खुर्दच्या महिलांनी केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा तहसील कार्यालयावर धडक देवून दारूबंदीसाठी निवेदन दिले आहे. या निवेदनावर विचार करुन सात दिवसांत दारूबंदीसाठी योग्य पाऊस उचलण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले की, यापूर्वी गावात दारूबंदी व्हावी म्हणून २१ एप्रिल, २३ एप्रिल व ३ मे रोजी निवेदन देण्यात आले होते. परंतु या निवेदनावर कोणताच विचार करण्यात आला नाही. दारूबंदीवर निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा बोलविण्यात आली. परंतु ग्रामसभेत गोंधळ घालून यावर चर्चा न होऊ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे गावात दारूबंदी होण्यास अडथळे निर्माण केले जात आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. राजकारण्यांनी फिरवली पाठ महिलांनी दारूबंदीसाठी एक प्राणाणिक पाऊल उचलून एल्गार करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलांच्या या मागणीकडे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरविली असल्याचा आरोप सुद्धा गावातील महिलांनी केला आहे. लिपिकाने स्वीकारले निवेदन दारूबंदीसाठी निवेदन देण्यासाठी गेले असता सालेकसा तहसीलदार हे गोंदियाला मिटिंगला गेले अशी माहिती मिळाली. त्यांच्या जागी कुणीही नायब तहसीलदार नव्हते परिणामी लिपिकाने निवेदन स्वीकारले.
दारुबंदीसाठी महिला झाल्या उग्र
By admin | Published: May 15, 2017 12:19 AM