बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील विहीरगाव-बडर्या येथील महिला दारूबंदीला घेऊन आक्रमक झाल्या असून शेकडो महिलांनी सोमवारी (दि. १६) दुपारी गावात दारूविक्री बंद करा, अशी मागणी करीत अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात निवेदन दिले. एवढेच नाही तर, या आक्रमक महिलांनी सायंकाळी गावात अवैधपणे देशी दारूचा पुरवठा करणाऱ्यास रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील विहीरगाव-बडर्या जंगलाच्या सान्निध्यात असलेले एक छोटेसे गाव आहे. गावात अवैध दारूविक्री करणाऱ्यांचा पायपोस नव्हता. मात्र गावातील काही शौकीन जवळच्या गावातून आपली इच्छापूर्ती करून येत. त्यानंतर आजघडीला गावात अवैधपणे सर्रास दारूविक्रीने कहर केला आहे. गावात शांततेला गालबोट लागले. कुटुंबात ताणतणाव निर्माण झाले. व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढू लागले व याची झळ महिलांना बसू लागली आहे. यामुळे संतप्त महिला बघता-बघता एकत्र आल्या असून त्यांनी गावातून अवैध दारूविक्रीला हद्दपार करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी सोमवारी दुपारी ‘गावातील दारूविक्री बंद करा,’ अशी मागणी करीत अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात निवेदन दिले. एवढेच नव्हे तर आक्रमक झालेल्या महिलांनी सायंकाळी गावात पाळत ठेवली. अवैधपणे देशी दारूचा पुरवठा करणारा गावाच्या शिवेत येताच महिलांनी त्याला देशी दारूच्या पिशवीसह पकडून ताब्यात घेतले व पोलिसांना त्याची माहिती दिली.
पकडण्यात आलेला तरुण सानगडी येथील आकाश गोवर्धन कुंभरे (वय २२) असून त्याच्या पिशवीत ९९ मि.लि.ने भरलेले ९७ पव्वे मिळाले आहेत. पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले असून कलम ६ (ई) ७७ (अ) मदाकाअन्वये गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनात नापोशी ओमराज देव्हारे तपास करीत आहेत. महिलांच्या एकसंध, आक्रमक वृतीने अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे दिसत आहे.