चंद्रकांत पुलकुंडवार : डिजिटल साक्षरता कार्यशाळेत महिलांना स्वावलंबनाचे धडे गोंदिया : सावित्रीबाई फुले झाल्या नसत्या तर महिला सक्षम झाल्या नसत्या. जगाच्या इतिहासात महिलांसाठी काम करणारी व्यक्ती सावित्रीबाई फुले एवढी कोणीही झालेली नाही. आपण महिला सक्षमीकरणात चांगला टप्पा गाठलेला आहे. त्याला आज व्यवस्थीत आकार देण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुलेंचे स्वप्न साकार करण्यासाठी महिलांनी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जयंतीनिमित्त डिजिटल साक्षरता कार्यक्रम घेण्यात आले. यात ते उदघाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक मनोज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर व गुगल इंडियाचे तज्ज्ञ मार्गदर्शक सिध्दार्थ यांची उपस्थिती होती. डॉ.पुलकुंडवार पुढे म्हणाले, अमेरिकेच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महिला विरूध्द पुरूष असा लढा होता. या निवडणुकीत हिलरी क्लिंटन या महिलेचा पराभव झाला. तेथे आजही पुरु ष प्रधान मानिसकता आहे. पुरूष आजही तेथे स्त्रीला बॉस म्हणून स्वीकारायला तयार नाही. आपल्याकडे सावित्रीबाई फुले होवून गेल्यामुळे समाजाची मानिसकता निश्चितपणे बदललेली आहे. देशाचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल ही पदेदेखील महिलांनी भूषिवलेली आहे. महिला, मुलींनी शाळा कॉलेजमध्ये जावून शिक्षण घेणे म्हणजे सक्षम होणे नव्हे, असे सांगून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, रूढी, परंपरा, वाईट चालीरितीच्या जोखडातून महिलांना मुक्त करायचे आहे. आजही स्त्रीभृण हत्या थांबवण्यासाठी विविध कार्यक्र माची गरज पडत आहे. स्त्रीचा आग्रह असतो की, वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजे. मुलासाठी आग्रहसुध्दा स्त्रीच धरते, ही मानिसकता बदलविण्याची आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. डिजिटल साक्षरतेसाठी माविमच्या महिलांनी काम करावे. डिजिटल व्यवहारामुळे पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचेही डॉ.पुलकुंडवार यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ म्हणाले, ज्या-ज्या वेळी महिला सक्षमीकरणाचा विषय येतो तेव्हा पोलीस विभाग याकडे अत्यंत आत्मियतेने व संवेदनशीलपणे बघत असते. स्त्री व बालकांवर होणारे अत्याचार हा पोलिसांचा महत्वाचा विषय आहे. प्रत्येक पातळीवर याबाबत जनजागृती करण्यात येते. गुन्ह्यांचा आलेख बघितला तर महिला व बालकांवर होणारे अत्याचार हा प्रकार अतिशय गंभीर गुन्ह्यांचा आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध कायद्याच्या तरतुदी असल्याचे त्यांनी सांगितले. बेदरकर म्हणाल्या, महिलांना अज्ञानाच्या अंधकारातून काढून जीवनात प्रकाश आणण्याचे काम सावित्रीबार्इंनी केले. सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांना भारतरत्न ही उपाधी देणे आता चुकीचे आहे. या महामानवांना कित्येक वर्ष आधीच ही उपाधी देण्याची आवश्यकता होती. पूर्वी महिलांच्या हाती पोळपाट होते, आता लॅपटॉप, आयपॅड आलेले आहे. इंटरनेट साथी असलेल्या महिला सावित्रीबाई फुलेंचा आदर्श पुढे ठेवून तयार झालेल्या आहेत. देशात ज्या-ज्या सुधारणा झाल्यात त्या सुधारणांचे मानकरी फुले दाम्पत्य असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.हुबेकर म्हणाल्या, सावित्रीबार्इंनी महिलांना शिक्षण दिले, पण महिला आरोग्याच्या बाबतीत साक्षर झालेल्या नाही. आरोग्य विभागाच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत. या योजनांचा महिलांनी लाभ घेण्याची आवश्यकता आहे. महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर होवून त्यातून आरोग्य सुधारणा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी खडसे व नाबार्डचे जागरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी सांगितले की, माविमच्या बचतगटांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्यात येत आहे. त्यांचे उपजीविकेचे साधनही वाढविण्यात येत आहे. इंटरनेट साथीच्या माध्यमातून कॅशलेस गोंदिया करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी इंटरनेट साथी गीता भोयर, बेबिनंदा वाघमारे, तृप्ती बहेकार, प्रीती दोनोडे, ममता नेवारे, प्रमिला मोहते यांनी मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मुक नाटिका उत्कर्ष साधन केंद्र गोंदियाच्या महिलांनी सादर केली. इंटरनेट साथी मंदिरा शहारे यांनी कविता सादर केली. कार्यक्र माला जिल्ह्यातील १०१ इंटरनेट साथी महिलांची उपस्थिती होती. संचालन योगीता राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार आशा दखने यांनी मानले.(प्रतिनिधी) कॅशलेस गोंदियासाठी आधी महिलांनी कॅशलेस व्हावे आपल्या मार्गदर्शनात श्रीवास्तव म्हणाले, महिलांनी कॅशलेस होणे गरजेचे आहे. इंटरनेट साथीच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिलांना आपले बँक खाते मोबाईल नंबरवर जोडावे लागणार आहे. कॅशलेस गोंदिया करण्यासाठी प्रत्येकाने काळजीपूर्वक स्वाईप मशीनचा वापर करावा. या मशीनवर गोपनीय नंबर टाकताना तो कोणाला दिसणार नाही, याची काळजी घ्यावी. आधार कार्ड, मोबाईल नंबर व बँक खाते क्र मांक एकमेकांशी जोडले जाणार आहे. कॅशलेस गोंदियासाठी प्रत्येकाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असावे. प्रधानमंत्री आवास योजना, सुलभ शौचालय योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पीडित महिलेला न्यायासाठी कायद्याचे अधिष्ठान दिल्लीतील निर्भया घटनेनंतर कायद्यात काही सुधारणा झाल्या असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ म्हणाले, पीडित महिलेला न्याय देण्यासाठी राज्य घटनेपासून ते कायद्याचे अधिष्ठान समोर आणलेले दिसते. जस्टीस वर्मा समितीने ज्या शिफारशी केल्या आहेत त्या एकमताने संसदेने मंजूर केल्या आहे. पीडित महिला व मुलींना न्याय देण्यासाठी पोलीस विभाग आपले दायित्व पार पाडत आहे. महिला व मुलींच्या छेडखानीच्या घटना टाळण्यासाठी निर्भया पथके तयार करण्यात आली आहे. इंटरनेट साथी महिलांच्या माध्यमातून सकारात्मक काम होत आहे. इंटरनेटचा अल्पवयात दुरूपयोगही होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून महिलांनी ज्ञान प्राप्त करून घ्यावे, असे सांगितले.
महिलांनो, सावित्रीबार्इंचे स्वप्न पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2017 12:53 AM