कपिल केकत
गोंदिया : कोरोना लसीकरणात गोंदिया जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रस्थानी असून, आतापर्यंत जिल्ह्यात ३५.८७ टक्के लसीकरण झाल्याची नोंद आहे. असे असतानाच मात्र, जिल्ह्यातील महिलाशक्तीने ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवून देत, पुरुषांपेक्षा जास्त संख्येत लसीकरण करवून घेत आघाडी घेतली आहे. सोमवारपर्यंतच्या (दि.५) आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील २,३३,२३६ महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
कोरोनाला मात देण्यासाठी आता सर्वांचे लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने, आता राज्यात लसीकरणाची मोहीम जोमात राबविली जात आहे. जिल्ह्यातही लसीकरण सुरू असून, आपला जिल्हा १०० टक्के लसीकरण झालेला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लसीकरण चळवळच सुरू केली आहे. लसीकरणाच्या सुरुवातीपासूनच जिल्हा अग्रस्थानी राहिला आहे. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून त्यांच्यात जनजागृती केली जात असल्याने, आता नागरिक लस घेण्यासाठी स्वत:च पुढे येत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, सोमवारपर्यंत (दि.५) जिल्ह्यात ४,६६,२०८ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची ३५.८७ एवढी टक्केवारी आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणात महिला शक्तीने आघाडी घेतली असून, कुटुंबाच्या रक्षणासाठी पुरुषांनीही पुढे यावे, असा संदेश दिला आहे. सोमवारपर्यंतच्या लसीकरणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. यामध्ये २,३२,९७२ पुरुषांनी लस घेतली असतानाच, २,३३,२३६ महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची नोंद आहे.
-----------------------------
राज्यातही गोंदिया जिल्ह्यातील महिलांचाच डंका
देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून गोंदिया जिल्हा जोमात कामाला लागला असून, अधिकाधिक लसीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. याचे फलित असे की, जिल्ह्यात आतापर्यंत ४,६६,२०८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यातही २,३३,२३६ महिलांनी लस घेऊन महिलांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या राज्यातच महिलांची आघाडी असलेला गोंदिया जिल्हा एकमेव ठरला आहे. म्हणजेच राज्यातही गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी आपला डंका वाजविला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
-------------------------