लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : घराच्या छपरात झोपून असलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पांढरवाणी झोळेटोली येथे घडली. मंदा रामदास कुंभरे (५१) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान राखीव वनालगत असलेल्या पांढरवाणी झोळेटोली येथील मंदा रामदास कुंभरे (५१) ही महिला आपल्या राहत्या घराच्या छपरात झोपली होती.सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश करुन तिच्या उजव्या पायाच्या चावा घेतला. तिने आपल्या पायाला झटका मारुन आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक एकत्र आल्याने आरडाओरड केल्यानंतर बिबटे पळून गेला. अंधार असल्यामुळे बिबट्याला मंदाबाई दिसली नसावी. त्यामुळे बिबट्याने तिच्या उजव्या पायाच्या चावा घेऊन ओढण्याचा प्रयत्न केला. मंदाबाईने पायाला झटका मारुन बिबट्याच्या तावडीतून सुटका करुन घेऊन आरडाओरड केल्यामुळे तिचा जिव वाचला. मंदाबाईचे नशिब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला.अंगणात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. तिला ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रादेशिक वन विभाग नवेगावबांधचे क्षेत्रसहाय्यक डी.एस.सोनवाने यांनी मोक्याची चौकशी करुन पंचनामा केला. पुढील तपास वनविभाग करीत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 9:55 PM