गोंदिया : ग्रामसभेत ठराव घेतल्यानंतरही गावातील दारूबंदी का झाली नाही, याचा जाब विचारण्यासाठी गावातील महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच सरपंच व सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यात आल्याचा प्रकार ग्राम सावरटोला येथे सोमवारी (दि.२४) घडला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांना बाहेर काढण्यात आले व सरपंचांच्या आश्वासननंतर महिलांनी मोर्चा मागे घेतला.
मागील १० वर्षांपासून गावात अवैध दारू विक्री बंद होती. परंतु मागील वर्षापासून पुन्हा गावातील ४ व्यक्ती अवैध दारू विक्री करीत आहेत. याबाबत ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत गावातील अवैध दारू बंद करण्यात यावी, याबाबत ठराव घेण्यात आला होता. परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी अद्यापही झाली नव्हती. ठरावाची अंमलबजावणी का झाली नाही, याचा जाब विचारण्यासाठी सावरटोला गावातील समृद्धी व संकल्प ग्राम संघ अंतर्गत महिला बचत गटांतील शेकडो महिला तसेच पुरुषांनी सविता वलथरे व कविता डोये यांच्या नेतृत्वात ग्रामसंघ कार्यलयातून ग्रामपंचायत कार्यालयावर सोमवारी (दि. २४) मोर्चा काढला.
ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा सुरू असताना दुपारी १२.३० वाजतादरम्यान महिला, पुरुष व युवकांचा मोर्चा ग्रामपंचायतवर येऊन धडकला. याप्रसंगी महिलांनी सरपंच युवराज तरोणे यांना विचारणा केली असता, त्यांनी महिलांशी चर्चा केली. मोर्चेकरी महिलांना सरपंच तरोणे व सदस्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे समाधान झाले नाही व त्यामुळे संतप्त मोर्चेकरी महिलांनी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडून बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर सरपंच तरोणे यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना माहिती दिली.
यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व सरपंच, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, सचिव व पोलिसांशी आंदोलन करणाऱ्या महिलांनी चर्चा केली तसेच सरपंच तरोणे यांना निवेदन दिले. चर्चेनंतर सरपंच तरोणे व पोलिसांनी महिलांना गावात जे अवैधरीत्या दारू विक्री करतात त्यांना नोटीस बजावण्यात येणार व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले. तेव्हा कुठे मोर्चेकरी महिला, पुरुष व युवक शांत झाले व आंदोलन मागे घेतले.