साखरीटोला : स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी महिलांनी सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग वाढवून मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष घातले पाहिजे जेणेकरून त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहतील उच्च शिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी करू शकतील ज्यामुळे स्वावलंबी जीवन जगण्यास प्रवृत्त होतील, असे उद्गार जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी काढले. साखरीटोला येथे महिलांच्या हळदीकुंकु व महिला मेळाव्याप्रसंगी बोलत होत्या. स्वदेशी जिल्हा क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी महिलांसाठी हळदीकुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, जि.प.सदस्या लता दोनोडे, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, सरपंच संगीता कुसराम, डॉ. सुषमा देशमुख, माजी पं.स.सदस्या संगीता शहारे, मुख्याध्यापिका अजया कठाणे, वंदना काये, ज्योती वानखेडे, अर्चना चाटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले, विद्येची माता शारदा माता यांच्या चैलचित्राच्या पूजनाने करण्यात झाली. यावेळी शेकडो महिला उपस्थित होत्या. महिलांनी एकमेकांना हळदीकुंकु लावून वाण वाटला. याप्रसंगी सविता पुराम यानी सुध्दा आपल्या भाषणातून महिलांना सामाजिक कार्यात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच बेटी बचाओ नारा लावण्यात आला. संचालन सहायक शिक्षिका गिता काटेखाये यांनी तर आभार साधना साखरे यांनी मानले.(वार्ताहर)
महिलांनी सामाजिक कार्यात रूची वाढवावी- उषाताई मेंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2016 1:46 AM