परसवाडा : आज बचतगटांच्या माध्यमातून महिला आपली आर्थिक बाजू मजबूत करून आपले कुटुंब सांभाळत आहेत. महिलांनी आता बचत गटांच्या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू करून यश गाठावे, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्त्रीशक्ती लोकसंचालित संस्थेच्या शाखा व्यवस्थापक रेखा रामटेके यांनी केले.
आर्थिक विकास महामडंळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत ग्राम करटी (बु) येथील स्त्री शक्ती लोकसंचालित साधन केंद्रात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
उद्घाटन सतीश मार्कंड यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिल्पा येळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मनीष सुध्दलवार, रेखा खोब्रागडे, मनोज बीसेन, प्रीया पटले, नम्रता गौतम, रूपाली चौधरी उपस्थित होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. याप्रसंगी बचतगटातील महिलांचा पुष्पगुच्छ व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गटातील महिलांनी स्टाॅल व प्रर्दशनी लावली होती व त्यांचे निरीक्षण करून प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षीस देऊन तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शबनम शेख यांनी प्रास्ताविक केले. हेमलता पटले यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली भैरम यांनी आभार मानले.