गोंदिया: घराचे दार न लावता स्नेहसंमेलन बघण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरातून चोरट्यांनी बॅगमध्ये ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व रोख असा एकूण एक लाख ३१ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत अंगूरबगिचा वॉर्ड क्रमांक दाेनमध्ये शुक्रवारी (दि. ५) भरदिवसा दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजता दरम्यान ही घटना घडली.
फिर्यादी कल्पना लक्ष्मीकांत वंजारी (४२, रा. अंगूरबगिचा वॉर्ड क्रमांक दाेन) यांनी शुक्रवारी बेडरूममधील पलंगावर एका बॅगमध्ये दागिने व रोख रक्कम काढून ठेवली व घरातचे दार न लावता मुलीच्या शाळेत स्नेहसंमेलन बघण्यासाठी निघून गेल्या. ही संधी साधून चोरट्यांनी बॅगमधील २७ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन पुणेरी नथ, ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे एक मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्राचे लॉकेट, २२ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ४५० रुपये किमतीच्या चांदीच्या तीन अंगठ्या, एक हजार २०० रुपये किमतीच्या चांदीच्या दोन जोड पायल, ७५० रुपये किमतीची चांदीची चेन व २० हजार रुपये रोख असा एकूण एक लाख ३१ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी भादंवि कलम ३८० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.