आमगाव : तालुक्यातील कालीमाटी येथे अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, तर व्यसनामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. गावातील वातावरणसुद्धा कलुषित होत आहे. त्यामुळे या परिसरातील अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी आता महिलांनी कंबर कसली आहे.
कालीमाटी हे गाव केंद्रस्थानी असल्याने या गावांतर्गत ४० हजारांवर लोकसंख्या वसलेली आहे. या ठिकाणी सिंचन विभाग, वैनगंगा ग्रामीण बँक, जीडीसीसी बँकेची शाखा आहे. कनिष्ठ महाविद्यालय, पदवीधर महाविद्यालय व छोटे-मोठे उद्योग वसले आहेत. त्यामुळे या गावात बाहेरील गावातील नागरिकांची नेहमी वर्दळ असते. लाॅकडाऊनच्या काळापासून येथील अवैध धंद्यांना ऊत आला. काही बेरोजगार युवक आमगाव येथून देशी, विदेशी, मोहफुलाची दारू आणून गावात विक्री करीत आहेत. यामुळे गावातील वातावरण कलुषित होत असून महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे, तसेच यासंदर्भातील निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांना दिले. शिष्टमंडळात दारूबंदी समितीच्या अध्यक्षा शांता चंद्रिकापुरे, उपाध्यक्ष किरण शेंडे, विजय फुंडे, पुष्पा पटले, रोहिणी भांडारकर, निर्मला मेहर, सुनीता शेंडे, पुष्पाबाई बहेकार, सत्यभामा गिरेपुंजे, प्रमिला मेश्राम, ताराबाई तरोणे, आशा रहांगडाले, इंद्रकला रहांगडाले, भूमिका गिरेपुंजे, रत्नकला कुकडीबुरे, अनुसया मेश्राम, पूजा गिरेपुंजे, रत्नकला फुंडे, किरण कुकडीबुरे, मंजू चुटे, निर्मला फुंडे, उपसरपंच प्रशांत बहेकार, माजी उपसरपंच पुरुषोत्तम चुटे यांचा समावेश होता.