पिपरिया ग्रामपंचायतीअंतर्गत १८ टोल्यांचा समावेश आहे. त्यात पिपरिया, रामाटोला, कारुटोला, निमटोला, कोहकाटोला, गोवारीटोला, टेभुटोला, चिचटोला, आलीटोला, गल्लाटोला, नवाज, हलबीटोला, गुलाबटोला, लोधीटोला या गावांचा समावेश आहे. या गावांतील नळाला पाणी येत नसून गावातील बोअरवेल सुद्धा बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. बोअरवेल दुरुस्ती करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे बंद पडलेले बोअरवेल सुरू करण्यास सुद्धा अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येत अधिक भर पडली आहे. मागील सात दिवसांपासून गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र, याची अद्यापही गावकऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.
.......
प्रशासनाचे दुर्लक्ष
पिपरिया व त्याअंतर्गत येणाऱ्या १८ टोल्यांमध्ये मागील सात दिवसांपासून पाणी टंचाई आहे. गावकऱ्यांची यासाठी सातत्याने ओरड सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बोअरवेल बंद पडले आहेत. सार्वजनिक विहिरींचे स्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करून पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे; पण याकडे तालुका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.