नवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोहलगाव-गोठणगाव रस्त्याचे काम मागील ४ वर्षांपासून बंद आहे. वन कायद्याच्या नावाखाली या रस्त्याचे बांधकाम खोळंबले आहे. यामुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहे. या रस्त्याचे खोळंबलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या कोहलगाव-गोठणगाव १४ किमी. रस्ता रूंदीकरण व दुरुस्तीसाठी सन २०१६-१७ मध्ये १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा रस्ता जंगलातून जात आहे, असे कारण पुढे करून नवेगावबांध येथील उपविभागीय वनअधिकारी मनोहर गोखले यांनी रस्त्याचे डांबरीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू होताच कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला काम बंद करण्याची नोटीस बजावली होती. तेव्हापासून या रस्त्याचे काम बंद पडले आहे. सद्यस्थितीत रस्त्याला २-३ मीटरचे खड्डे पडले आहेत. कोहलगाव-चिचगड-धाबेपवनी या २५ किमी.पर्यंत रस्त्याच्याकडेला घनदाट राखीव जंगल आहे. सन २०१९-२० मध्ये या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. यावेळी वन विभागाचा वनकायदा नव्हता का? असा सवाल केला जात आहे.
.........
रस्त्याचे काम बंद
कोहलगाव-गोठणगाव हा रस्ता पूर्वीपासून असून, सन १९५० ते १९६० यादरम्यान इटियाडोह धरण बांधत असताना या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाले होते. तेव्हापासून साकोली-केशोरी बससेवा सुरू आहे. या रस्त्याचे अनेक वेळा डागडूजीचे काम करण्यात आले होते. त्यावेळेस अनेक वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या रस्त्याने जात -येत असत; पण या रस्त्याचे काम अडविले नाही; परंतु गोखले स्वत:ला कार्यक्षम व कर्तव्यदक्ष असल्याचे समजून रस्त्याचे काम बंद केले.
...............
रखडलेल्या बांधकामाला जबाबदार कोण
वन विभागाने सन २०१८-२१ पर्यंत कालीमाटी जंगलात सहा शौचालय व सहा बाथरूमचे बांधकाम सागवन झाडे कापून केले होते, तसेच समाजमंदिरसुद्धा बनविण्यात आले होते. असे अनेक उदाहरणे आहेत; पण अधिकारीच धृतराष्ट्राच्या भूमिकेत काम करीत आहेत. मग कोहलगाव-गोठणगाव रस्त्याचे बांधकाम वनकायदा समोर करून का बंद करण्यात आले. या रस्त्याचे बांधकाम बंद करण्यास जबाबदार कोण? अधिकारी की लोकप्रतिनिधी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.