१०० विहिरी खचण्याच्या मार्गावर : सरपंच संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारातुमसर : तुमसर पंचायत समिती अंतर्गत २०० शेतविहीरींना ३१ मार्चपूर्वी वर्क आॅर्डर देण्यात आले. १०० विहीरींचे खोदकाम शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सुरू केले. सिमेंट बांधकामाअभावी या विहीरी भूईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येणार आहे.मागेल त्याला शेततळे व ६०-४० च्या नियमानुसार दुष्काळावर मात करण्यासाठी सिंचनाची सोय व्हावी याकरिता विहीरीला मंजुरी प्रदान करण्यात आली. तुमसर पंचायत समिती अंतर्गत ३१ मार्चपूर्वी २०० सिंचन विहीरींना वर्क आॅर्डर देण्यात आले. १०० विहीरी शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहीरींचे खोदकाम केले. सिमेंट काँक्रीटची कामे करणे आता शिल्लक आहेत. राज्य शासनाने आतापर्यंत एका पैशाचा निधी शासनाने दिला नाही. पावसाळा तोंडावर असल्यामुळे या विहीरी खचून बुजतील शासन येथे नुकसान भरपाई देईल का?, असा प्रश्न येथे शेतकऱ्यांना पडला आहे. येथे खोदकामाचा दर ४ हजार रूपये फूट इतका आहे. ३० ते ३५ फूट विहीरी येथे खोदण्यात आलेल्या आहेत. नियमानुसार जनतेच्या परिश्रमाने ६० टक्के अकुशल व ४० टक्के कुशल असे समीकरण शासनाचे आहे. त्या धर्तीवर शासन विहीरी मंजूर करते. येरली येथे ८ विहीरींचे २४ फूटपर्यंत खोदकाम करण्यात आले. या विहीरींना बांधकामाची प्रतिक्षा आहे. तुमसर तालुक्यात ३२८ विहीरींना मंजुरी मिळाली आहे. निधी प्राप्त न झाल्यास गावातील कामे तर रखडतील, परंतु पैसा कुठून द्यावा, असा प्रश्न सरपंचाना भेडसावत आहे. निधी न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन लांजेवार, येरलीचे सरपंच मदन भगत, दिलीप लांजेवार महेगाव, नितू मासूरकर राजापूर, खडकसिंग राणे हरदोली यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
निधी नसतानाही दिली ‘वर्क आॅर्डर’
By admin | Published: May 06, 2016 1:30 AM