प्रकरण आंतरजिल्हा बदलीचे : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावली नोटीसलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत विभागीय आयुक्तांनी चौकशीअंती दोषी ठरविलेल्या पाच कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाचे आदेश बजावले. या पाच कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी स्पष्टीकरण मागितले आहे.जिल्हा परिषद अंतर्गत ११७ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. याप्रक्रियेत सहा शिक्षक न्यायालयात गेल्याने १११ बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद प्रशासनात यावर्षी शिक्षक बदल्यांचे प्रकरण अत्यंत वादग्रस्त ठरले आहे. रोस्टर तयार होण्यापुर्वी बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून शासकीय नियमांना बगल दिल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता. याबाबत आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीवरून चौकशी समिती नेमली. या समितीने चौकशीत दोषी आढळून आलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकारी अभयसिंह परिहार, कक्षाधीकारी नलिनी डोंगरे, अधीक्षक रामभाऊ तरोणे, वरिष्ठ सहायक सुरेश येवले, वरिष्ठ सहायक तथा जि.प. उपाध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक मनिष वहाणे यांच्यावर ठपका ठेवला होता. यासंदर्भात विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना सादर केलेल्या अहवालावरून पाचही जणावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करताना प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. जगन्नाथ भोर हे सध्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळीत आहे. त्यांनी या पाचही जणांना स्पष्टीकरण मागितले आहे. याबाबत त्यांना नोटीस तामील करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहे. या पाचही जणांविरूद्ध स्पष्टीकरण मागितले असून या स्पष्टीकरण आदेशामुळे प्रकरणाला "कलाटणी" देण्याचा प्रकार तर होत नाही ना, अशी शंका आता वर्तविण्यात येत आहे.
‘त्या’ कर्मचाऱ्यांना स्पष्टीकरण मागितले
By admin | Published: June 23, 2017 1:18 AM