आमगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र बिकट परस्थिती निर्माण झाली आहे. आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र कामधंदे ठप्प आहेत. अशातच मोलमजुरी करणाऱ्या मजुरांची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. मजुरांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका व जिल्हा प्रशासन प्रयत्नरत आहे. लॉकडाऊनला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. मात्र लघुव्यावसायिक व हातावर पोट असणाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, आर्थिक संकट निर्माण होत आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती अशी अवस्था झाली आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने ‘ब्रेक द चेन’मुळे १५ मेपर्यंत बंद आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी काही वेळ निश्चित करून दिली आहे. अगोदरच कामधंदे बंद झाल्यामुळे मजुरांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे मजुरांच्या संकटात भर पडली आहे.
मदतीसाठी पुढे येण्याची गरज
संचारबंदी लागू करण्यापूर्वी सर्वसामान्य व गरीब लोकांचा प्राधान्याचे विचार करून रोजीरोटी कायम ठेवण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र मजुरांना अजूनही रोजगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, थेट त्यांच्या हातात मदत कशी जाईल, याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे.