गोंदिया : महाराष्ट्र राज्य महिला आयोग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण’ या विषयावर व प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ च्या अंमलबजवाणीबाबत एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार होते. अतिथी व वक्ते म्हणून कायदे सल्लागार अॅड. श्रद्धा सपाटे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक हर्षल बाबर, हवालदार मोरे उपस्थित होते. या वेळी अॅड. श्रद्धा सपाटे यांनी स्त्रिचे लैंगिक छळ म्हणजे काय?, असा छळ थांबविण्यासाठी तयार करण्यात आलेले विविध अधिनियम, तक्रारींचे विविध स्त्रोत, अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी या विषयांवर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पोलीस विभागाचे विविध नियम, तक्रार करण्याची पद्धत, बाळगण्यात येणारी गोपनियता, संरक्षणात्मक निर्भया, दक्षता समिती पथक याबाबत माहिती सांगून विद्यार्थिनींनी कसलाही लैगिंक छळ सहन करू नये, असे आवाहन केले. हर्षल बाबर यांनी विनयभंग कसल्याही प्रकारचा असो, तरी तो गुन्हा ठरतो, असे सांगितले. महिला लैंगिक छळ संरक्षण समितीच्या प्रभारी डॉ. राजश्री धामोरीकर यांनी पीपीटीद्वारे संबंधित विषयाची संपूर्ण माहिती सांगितली. डॉ. माधुरी नासरे यांनी ‘गुड टच-बॅड टच’ यामधील फरक सांगितला. प्रास्ताविक डॉ. रेखा लिल्हारे यांनी मांडले. संचालन ग्रंथपाल राजश्री वाघ यांनी केले. आभार प्रा. निता खांडेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
लैंगिक छळ संरक्षणावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2017 12:17 AM