७९० विद्यार्थी सहभागी : कोयलारी येथे झाले प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनतिरोडा : आदिवासी विद्यार्थ्यांची शरीरकाठी मजबूत व दणकट असते. त्यामुळे त्यांची खेळाची क्षमता इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त असते. त्यांना ही ईश्वरनिर्मित देणगी मिळाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना खेळात निपून बनवायची जबाबदारी क्रीडा शिक्षकांची असते. त्यांनी आपले विद्यार्थी जागतिक स्तरावरील स्पर्धेत आॅलम्पिकमध्ये मेडल मिळवू शकतील यासाठी प्रयत्नशील राहावे, असे मार्गदर्शन देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी केले.शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोयलारी ता. तिरोडा येथे देवरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आदिवासी विकास विभागातील प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक तसेच सांघिक खेळांची सुरुवात झाली. त्यासाठी प्रकल्पांतर्गत एकूण ७९० विद्यार्थी सहभागी झाले. त्यात ४०८ मुले व ३८२ मुली आहेत. तर एकूण ७३ क्रीडा शिक्षक असून त्यात ५४ पुरुष व १९ महिला आहेत. ही स्पर्धा १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान होत आहेत. यामध्ये क्रीडा स्पर्धेसोबतच रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रमांची स्पर्धासुद्धा होत आहे.उद्घाटन क्रीडाज्योत पेटवून व पथसंचलन नागपूरचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.के. बन्सोड यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी रघुते, बेले, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर राऊत, पोलीस पाटील परदेशी ठाकरे, ज्येष्ठ आदिवासी समाजसेवक सुकराम कळपती, ग्रामपंचायत सदस्य डॉ. मुकेश पटले, मुक्ता मडावी, सहकारी संस्था सदस्य हिरानंद ठाकरे, जंगल कामगार कमिटी उपाध्यक्ष दुर्गेश कळपती, प्रतिष्ठित नागरिक चंद्रशेखर पटले, मुख्याध्यापक बारसागडे, कोलारे, कळंबे, राऊत, लांजेवार, कमल कापसे, पंचभाई, प्रधान, पारधीकर आदी सर्व मुख्याध्यापक मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविक कोयलारीचे मुख्याध्यापक बी.आर. आष्टनकर यांनी मांडले. देवरी प्रकल्पाचे क्रीडा समन्वयक प्रेमलाल कोरांडे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व खेळ भावनेने खेळ खेळण्याचे आवाहन खेळाडूंना केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंडीनृत्य सादर करण्यात आला.अनुदानित आश्रमशाळा बुधेवाडा येथील विद्यार्थ्यांनी मंत्रमुग्ध करणारा आदिवासी नृत्य सादर केला. विभागाच्या अप्पर आयुक्त माधवी खोडे यांनी दुरध्वनीवरुन सर्वांना खेळाच्या शुभेच्छा देवून आदिवासी विद्यार्थी शरीराने मजबूत आहेत, त्यांनी आपली पूर्णपणे क्षमता दाखवावी, असे आवाहन केले. कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांच्या स्पर्धासुद्धा घेण्यास सांगितले. कार्यक्रमाचे संचालन खुणे यांनी तर आभार गावड यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
जागतिक स्तरावर खेळाडू पोहोचवा
By admin | Published: September 23, 2016 2:08 AM