आमगाव : पुढील १५ दिवसांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनापासून बचावाकरिता शासनाने सुचविलेल्या नियमांचे पालन केल्यास आपल्या व आपल्या कुटुंबाचे रक्षण स्वतःच करता येईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी कळविेले आहे.
कोरोना विषयी नागरिकांत भीती कमी झाली असली तरी विषाणूंचा प्रभाव कमी झाला नाही. पण स्वतः काळजी घेतल्यास स्वत:ला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवू शकतो. मी निरोगी आहे असे समजून विविध ठिकाणी नागरिक वावरत असतात. पण अशावेळी निरोगी व्यक्तीच्या सानिध्यात आल्यास दोघांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांनी या आजाराची गंभीरता लक्षात घेऊन विनाकारण घराबाहेर जाणे टाळणे, नेहमी मास्कचा वापर करणे, साबणीने हात स्वछ धुणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घराबाहेर पडल्यावर कुणाशीही हस्तांदोलन करू नका. त्याऐवजी वाकून नमस्कार किंवा हात जोडून नमस्कार करा अशा सूचना डॉ.चव्हाण यांनी केल्या आहेत.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या अनेकांमध्ये आजाराची कोणतीच लक्षणं नसतात. त्यामुळे आपल्याला विषाणू संसर्ग झाला आहे की नाही, हे कळत नाही. म्हणून घराबाहेर पडताना सर्वांनीच मास्क वापरणे हिताचे आहे. कोरोना विषाणूची महत्त्वाची लक्षणं म्हणजे ताप आणि कोरडा खोकला. याकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. काही रुग्णांमध्ये घसा खवखवणे, डोकेदुखी, जुलाब अशी लक्षणंही आढळली आहेत. शिवाय गंध आणि चव न कळणे,हे देखील कोव्हिड-१९ आजाराची लक्षणं मानली जात आहेत. अशात ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी असे डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.