कपिल केकत, गोंदिया : जाता-जाता का होईना मात्र पावसाने जिल्हावासीयांची सोय करून दिली असून, मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. यात प्रमुख प्रकल्पांतून पाणी सोडले जात असून, मध्यम प्रकल्पांनाही चांगले पाणी आले आहे. यामुळे आता वर्षभराची चिंता मिटली असून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचीही सोय झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आतापर्यंत पावसाने झटक्यांवर झटकेच दिले आहेत. सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने यंदा जिल्ह्यात खरिपाचा हंगाम पिकतो की नाही, याचीही शाश्वती नव्हती. मात्र, जुलै व ऑगस्ट महिन्यांतील पावसातून शेतकऱ्यांनी मोठे धाडस करून कशीतरी रोवणी आटोपून घेतली. मात्र, पिकांना पाण्याची गरज असतानाच पाऊस पाय काढून घेत होता. आता भारी धानाला पाण्याची गरज असतानाच ऐनवेळी देव पावला असून, गुरुवारपासून (दि. २१) बरसत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पाणीच पाणी झाले आहे. विशेष म्हणजे, या पावसाची भारी धानाला गरज होती. तर या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे तुडुंब भरली असून, त्यातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. याशिवाय मध्यम प्रकल्पांतही चांगले पाणी झाले आहे.
या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठा वाढल्यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे. प्रकल्पांत चांगला पाणीसाठा झाल्याने जिल्ह्याला पाण्याची सोय होणार आहे. शिवाय, शेतकऱ्यांनी त्यातून रब्बीसाठी पाणी दिले जाते. परिणामी, शेतकऱ्यांचेही रब्बीचे टेन्शन मिटले आहे.
बोदलकसा, रेंगेपार, कटंगी व कलपाथरी ‘फुल्ल’
- जिल्ह्यात नऊ मध्यम प्रकल्प असून, त्यामध्ये आता ८८.४ टक्के पाणीसाठा आहे. यातील बोदलकसा, रेंगेपार, कटंगी व कलपाथरी प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तर चोरखमारा प्रकल्पात ९५.७३, चुलबंद प्रकल्पात ६६.३०, खैरबंधा प्रकल्पात ८८.१०, मानागड प्रकल्पात ७३.११ तर संग्रामपूर प्रकल्पात ८३.२९ टक्के पाणीसाठा आहे. यातील चुलबंद प्रकल्पात कमी पाणीसाठा असला तरी असाच पाऊस बरसल्यास मात्र ही कमतरता भरून निघू शकते.प्रमुख प्रकल्पांत पाणीसाठाप्रकल्प- पाणीसाठा टक्केवारी- इटियाडोह - १०० टक्के (ओव्हरफ्लो)- सिरपूर- ८७.६७- कालीसराड- ९३.८२- (२ गेट उघडले)
- पुजारीटोला- ९६.६९ (४ गेट उघडले)