अर्जुनी मोरगाव : कृषी सहायक यशवंत कुंभरे व कृषी पर्यवेक्षक मुनेश्वर कठाणे माहुरकुडा येथून कार्यालयीन काम आटोपून परत येत असताना त्यांना निलज मार्गावर एक अनोळखी पक्षी रस्त्याच्या मधोमध निपचित पडलेला दिसला. कृषी अधिकाऱ्यांचे पक्षीप्रेम जागे झाले. त्यांनी लगेच त्याला उचलून पशुवैद्यकीय केंद्रात दाखल केले. पशुधन अधिकारी सुखदेव राऊत यांनी त्या पक्ष्याची तपासणी केली. एखाद्या वाहनाला धडक देऊन हा पक्षी जखमी झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तपासणीनंतर या पक्ष्याला जंगलात सोडून जीवदान देण्यात आले. हा पक्षी कापसी घर असल्याची ओळख पटविण्यात आली.
......
कापसी घार पक्षी पर्यावरण मित्र- प्रा. राऊत
हा पक्षी कापसी घार असून घारवर्गीय आहे. याचे शास्त्रीय नाव इलेनस सेरुलेअस असून मध्यम शुष्क प्रदेशात आढळणारा दिनचर शिकारी पक्षी आहे. याला मराठीमध्ये चचान किंवा पांजरा म्हणून ओळखतात. या पक्ष्याचे घारीशी साम्य असते. दुभंगलेल्या शेपटीमुळे हा घार कुटुंबात गणला जातो. काळ्या पंखांमुळे माळरानावर सहजपणे ओळखता येतो. हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा लहान असतो. वरचा रंग राखी करडा, खालचा पांढरा तर डोळ्यावर काळ्या रेषा, खाद्यावर पांढरे डाग असतात. उडताना तो स्थिर स्थितीत असला म्हणजे ते डाग ठळक दिसतात. मिटलेल्या पंखाची टोके शेपटीपेक्षा लांब दिसतात. याचे मुख्य खाद्य साप, उंदीर, सरडे, घूस, टोळ, नाकतोडे, पक्षी व किडे आहेत. आकाशात एकाच जागी स्थिर घिरट्या घालत शिकार करतो, अशी मागणी पक्षीमित्र प्रा. अजय राऊत यांनी दिली.
250921\184-img-20210925-wa0006.jpg
जखमी कापसी घार पक्ष्यावर उपचार करणारे डॉक्टर व कृषी कर्मचारी