वाली कोण ? : सोसायटी व वनविभागानेही केले दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क सौंदड : वनविभागाने ई-टेंडरिंगच्या माध्यमातून झाडे कापण्याचे काम एका सहकारी संस्थेला दिले; मात्र सदर काम करताना एका वनमजुराच्या पायावर झाड पडून त्याचा पाय मोडला. आता मात्र औषधोपचारासाठी वन विभागाने आपले अंग काढून घेत सदर संस्थेकडे बोट दाखविले आहे. तर संस्थेनेसुद्धा झेपेल तेवढेच खर्च करू, उर्वरित खर्च जखमीने स्वत: करावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या गरीब वनमजुराच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. सडक-अर्जुनी तालुक्याच्या सौंदड वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सिंदीपारच्या कंपार्टमेंट ५५७ येथील जवळपास एक हजार ५०० झाडे कापण्याचे काम वनविभागाने ई-टेंडरिंगच्या माध्यमातून जंगल कामगार सहकारी संस्था कोयलारी (तिरोडा) यांना २३ लाख रूपयांत दिले. सदर संस्थेने झाडे कटाईचे काम ७ मे २०१७ पासून सुरू केले. या कामावर १५ ते २० मजूर होते. या ठिकाणी १५ मे रोजी वनमजूर खुशाल परसराम सोनवाने (४५) रा. सातलवाडा व इतर मजूर झाड कापत होते. दरम्यान अचानक कापलेला झाड खुशाल सोनवाने या मजुराच्या पायावर पडला व त्यांच्या पाय मोडला. त्याला इतर ठिकाणीसुद्धा दुखापत झाली आहे. सुरूवातीलला सदर मजुराला उपचारासाठी साकोली येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रूपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. परंतु सदर मजुराची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेची जमावाजमव होवू शकली नाही. त्यामुळे त्याला उपचारासाठी नागपूर येथील मेडीकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर सध्या औषधोपचार सुरू आहे. सदर मजूर वनविभागाच्या कामावर असताना अपघात घडला. मात्र वन विभागाकडून कसलीही मदत करण्यात आली नाही. त्याचा एक पाय मोडल्याने त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देवून काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबत सडक-अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर जखमीला लागणारा खर्च सोसायटीने करावा, असे सांगितले. तर जंगल कामगार सहकारी संस्था कोयलारीचे (तिरोडा) सचिव शहारे यांच्याशी संपर्क साधला असता, सदर जखमीवर औषधोपचाराकरिता लागणारा खर्च संस्थेला झेपेल तेवढेच करू व उर्वरित लागणारा पैसा जखमीने खर्च करावा, असे सांगितले.
जखमी वनमजूर वाऱ्यावर
By admin | Published: May 20, 2017 2:00 AM