गोंदिया : तिरोडा तालुक्यातील वडेगाव सहवन क्षेत्रअंतर्गत कोडेलोहारा बिटात मौजा माल्ही येथे झुडपी जंगलचे गट क्रमांक २७० मध्ये मृतावस्थेत एक बिबट्या आढळल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.२०) या बिबट्याचा पंचनामा करून श्वविच्छेदन केले. त्यात बिबट्याच्या छातीवर एक जखम आढळल्याने या बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत शंका बळावली आहे.
कोडेलोहारा बिटात मौजा माल्ही येथे झुडपी जंगलचे गट नंबर २७० येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. क्षेत्र सहायक एम. एम. कडवे यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली व त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के. आकरे यांना सायंकाळी दिली. बुधवारी रात्री उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्याने बिबट्याचे श्वविच्छेदन करण्यात आले नव्हते.
गुरुवारी सकाळी घटनास्थळी उपवनसंरक्षक कुलराज सिंग, सहायक वनसंरक्षक आर. आर. सदगीर, तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के. आकरे, एकोडी पशुधन विकास अधिकारी डॉ. विवेक गजरे, वडेगाव पशुधन विकास अधिकारी डॉ. विद्या वानखेडे, तिरोडा पशुधन विकास अधिकारी डॉ. रेणुका शेंडे, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांच्या चमूमार्फत मृत बिबट्याच्या शरीराची तपासणी करण्यात आली. उपस्थित चमुच्या मार्फत शवविच्छेदन करून बिबट्याच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यात आला. आजूबाजूचा संपूर्ण जंगल परिसर श्वान पथकाच्या मदतीने पिंजून काढण्यात आला.
....
बिबट्याचे अवयवाचे नमुने पाठविले प्रयोगशाळेत
प्राथमिक तपासात बिबटच्या छातीवर खोल जखम आढळली. तसेच बिबट्याचा मृत्यू हा जखमेतून रक्तस्त्राव झाल्याने झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.बिबटच्या मृत्यूचे सविस्तर कारण शोधण्यासाठी वैद्यकीय परीक्षणासाठी मृत बिबट्याचे अवयवाचे नमुने घेण्यात आले. बिबट्याच्या शवविच्छेदन झाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत मृत
बिबट्याचे शरीर दहन करण्यात आले.