केशोरी : जिल्ह्यात बैलपोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे यावर्षी सुद्धा बैलपोळा घरच्या घरीच राहून साध्या पद्धतीने साजरा करावा लागल्याने बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट दिसून आले.
प्राणीमात्रावर दया करा, असा शुभसंदेश देणारा पोळा सण शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण दरवर्षी श्रावण अमावास्येला येतो. बैलांच्या शृंगारासाठी शेतकरी ८ दिवसांपूर्वीपासून नियोजन करीत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. बऱ्याच गावांमध्ये बैलपोळ्याचा फारसा उत्साह दिसून आला नाही. बदलत्या काळानुसार शेतातील कामे यंत्राच्या साहाय्याने केली जात असली तरीही, पोळ्याचा आनंद शेतकऱ्यांना वेगळाच होतो.
शेतकऱ्यांना सतत मदतीला असणारी बैलजोडी प्राणप्रिय असते. यासाठी शेतकरी पोळ्यानिमित्ताने बैलांना साजशृंगार करून त्यांच्याबद्दल पोळ्याच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र कोरोनाचे सावट असल्याने पोळ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पोळा साधेपणाने साजरा करावा लागला. सलग दुसऱ्याही वर्षी पोळा सणावर कोरोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.