केशोरी : दरवर्षी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) विद्यार्थ्यांसाठी मोठ्या उत्साहाचा समजला जातो. परंतु गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या महामारीने शाळा बंद असल्यामुळे या वर्षीही १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा विद्यार्थ्यांविनाच पार पाडावा लागला. त्यामुळे कोणत्याच शाळेत उत्साहाचे वातावरण दिसून आले नाही.
सध्या इयत्ता ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित न ठेवता स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा करावा असे आदेशात नमुद होते. अशात राष्ट्रीय कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या देशाभिमानापासुन दूर ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे स्वातंत्र्यदिनी आनंदाचा जल्लोष दिसून आला नाही. यावर्षी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताच १५ जुलै २०२१ पासून शासनाने ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु केल्या आहेत. अद्यापही पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या नाही. ज्या वर्गाचे विद्यार्थी शाळेत येणे सुरु आहे. त्या विद्यार्थ्यांना देखील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यापासून शासन वंचित ठेवत आहेत.
दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेतून गावागावात साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना वगळून साजरा करावा लागत आहे. जर शाळा सुरु नसत्या तर उपस्थितीचा प्रश्न निर्माण झाला नसता. परंतु शाळा सुरु होवूनही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कार्यक्रमापासून दूर ठेवणे हे विद्यार्थी हिताचे नाही. या प्रकारामुळे कोणत्याच गावात स्वातंत्र्याचा खरा जल्लोष दिसून आला नाही. गावातून निघणारी प्रभातफेरी, विद्यार्थ्यांच्या आवाजातून निर्माण होणारी ऊर्जा यातून देशाभिमान जागृत होतो. परंतु यावर्षी १५ ऑगस्टला विद्यार्थी नसल्यामुळे स्वातंत्र्याचा उत्साह पाहिजे तसा दिसून आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. शासन जिथे तिथे ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यास सांगत असले तरीही खेड्यापाड्यात ऑनलाईन सपशेल फेल ठरली आहे.