गोंदिया : नगर योग उत्सव समितीअंतर्गत आरोग्य भारती, अखिल भारतीय गायत्री परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, पतंजली योग समिती, रामकृष्ण सत्संग मंडल, श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट, योग मित्र मंडल, नेहरू युवा केंद्र, गोजूरूयू गोकोई कराटे डो स्पोर्ट्स असोसिएशन, गेम्स स्पोर्ट्स ॲण्ड कॅरिअर डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त वतीने २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जात असून, यंदा हा कार्यक्रम फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय समितीने रविवारी (दि.१३) बैठकीत घेतला आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे जागतिक योगदिनाचा मध्यवर्ती कार्यक्रम रद्द करण्यात आला होता व नागरिकांनी घरी राहूनच योग दिन साजरा केला होता. यंदाही कोरोनाचा कहर सुरूच असून, नागरिकांच्या आरोग्याला लक्षात घेता योग दिनाबाबत रविवारी (दि.१३) बैठक घेण्यात आली. त्यात कोरोना प्रादुर्भाव बघता सार्वजनिकरीत्या योग दिनाचा व्यापक कार्यक्रम न घेता एका सभागृहात विकास देशपांडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. यात व्यासपीठावर फक्त २ योग प्रशिक्षक राहणार व योगाभ्यासासाठी फक्त ५ व्यक्ती सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण होणार. यात नागरिकांनी २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता आपल्या घरातूनच योगाभ्यास करावा, असे योग उत्सव समितीने कळविले आहे. यासाठी समितीकडून जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले. बैठकीला नगर योग उत्सव समितीचे अध्यक्ष विष्णू अग्रवाल, आरोग्य भारती सचिव डॉ. प्रशांत कटरे, विनोद हरीणखेडे, श्याम चंदनकर, जोगेंद्र देशमुख, श्रृती डोंगरे, पुष्कर बारापात्रे, धरमलाल धुवारे, त्रिलोचन बग्गा, विपीनकुमार बैस, सुशील अग्रवाल, गोविंद येडे, अनिल भागचंदानी, राजकुमार गुप्ता, जय चौरसिया, डॉ. संजय आसुटकर, मनोज अग्रवाल, सुधांशू गायधने, अभय नशिने, नितेश गुरडे, प्रशांत बोरकर उपस्थित होते.