नरेंद्र कावळेलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ‘नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया’द्वारा आमगाव ते गोंदिया रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. आमगाव ते गोंदिया दरम्यान किमान २५ किलोमीटर रस्ता म्हणजे ‘मरायला सस्ता’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने ‘गोंदियावरून आमगावला येत आहे का मग जरा जपून’ असे वाक्य प्रत्येक माणसांच्या तोंडातून निघत आहेत . आमगाव ते गोंदिया सिमेंट रस्त्याचे बांधकाम व रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु कंत्राटदारांकडून कुठे खोदकाम तर कुठे खड्डे खोदून ठेवल्याने या रस्त्याने दररोज जाणारी हजारो वाहने खोळंबत असून दुचाकीस्वारांचे अपघातदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या रस्त्याने जाणे-येणे म्हणजे तारेवरची जणू कसरतच म्हणावी लागेल अशी परिस्थिती आहे. त्यातच प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यातील एका कंपनीमार्फत या रस्त्याचे काम सुरू असून संपूर्ण रस्ता उखडला आहे. एक बाजूला खोदकाम करून दुसरी बाजूसुद्धा ठेकेदाराने जाण्या-येण्यासाठी व्यवस्थित ठेवली नाही.....या रस्त्याच्या दुर्दशेमुळे राज्य परिवहन महामंडळाने या रस्त्यावर धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्यादेखील कमी करून टाकल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहने अपघातग्रस्त झालेली दिसून येतात. त्यातच दुचाकीचालकांना मोठ्या अपघातास निमंत्रण दिले जात आहेत. या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष दिसत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याची तपासणी करतानासुद्धा दिसून येत नाही. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने धुळीचे प्रमाणही वाढले आहे. धूळ उडू नये याकरिता रस्त्यावर पाणी टाकण्यात येत आहे. त्यामुळेही वाहन स्लिप होऊन अपघात होत आहे. कंपनीमार्फत कुठेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. कंपनीने नियोजनबद्ध पद्धतीने रस्त्याचे लवकरात बांधकाम करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
गोरेगाव मार्गाने ये-जा- आमगाव-गोंदिया मार्गाची दुर्दशा व त्यामुळे होणारा त्रास बघता देवरीवरून गोंदियाकडे येणारे तसेच गोंदियाहून देवरीकडे जाणारे आमगाव मार्ग सोडून गोरेगाव मार्गाने जाणे पसंत करीत आहेत. यामध्ये त्यांना फेरा मारावा लागत असून तेवढाच इंधनखर्च वाढत आहे. मात्र त्रास करून घेण्यापेक्षा फेरा मारणे जास्त सोयीचे ठरत आहे.