गोंदिया : गोंदिया शहराला ग्रीन गोंदिया करण्यासाठी धडपडत असलेल्या मॉ नर्मदा सेवा संस्थानच्यावतीने गोंदिया ग्रीन सिटी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ज्यांना कुणाला आपल्या परिसरात वृक्षारोपण करावयाचे आहे त्यांनी फक्त खड्डे खोदून संस्थेशी संपर्क साधावयाचा असून त्यानंतर संस्थाच तेथे वृक्षारोपण करणार असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
वृक्षांची मोठ्या प्रमाणात होत असलेली कत्तल पर्यावरण संतुलन ढासळण्यासाठी कारणीभूत आहे. वृक्षतोडीमुळेच सर्व काही बदलत चालले असून त्याचे दुष्पपरिणाम आता भोगावे लागत आहे. ऑक्सिजन महत्त्व कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जागापुढे आणले असून यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून या वसुंधरेला पुन्हा हिरवीगार करण्याची गरज आहे. यासाठी मॉ नर्मदा सेवा संस्थान धडपडत आहे. अशात आता संस्थेच्यावतीने ज्यांना कुणाला त्यांच्या परिसरात वृक्षारोपण करण्याची इच्छा आहे फक्त खड्डे खोदून ठेवावे व संस्थेशी संपर्क साधावा. त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी तेथे येऊन वृक्षारोपण करणार हा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या ३ जुलै रोजी या उपक्रमाला सुरुवात होणार असून संस्थेच्या माध्यमातून नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, सामाजिक वनीकरण विभाग, धनेंद्र अग्रवाल, सुशील सिंघानिया आदी एकाच दिवशी शहरात ठिकठिकाणी हजारो रोपट्यांची लागवड करणार आहेत.
या मोहिमेचे उद्घाटन हरिकाशी नगर येथे होणार असून याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे तारसेकर, शिव शर्मा, गोंदिया होमियोपॅथी महाविद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ स्वयंसेवक राधेश्याम अग्रवाल, शाला संचालक आशिष अग्रवाल, रेशमा अग्रवाल, प्राचार्या मधू पांडे, राष्ट्रीय स्वयंसेविका समिती नगर प्रमुख, साहित्यकार सुषमा यदुवंशी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
------------------
तुम्हाला काय करायचे?
शहरातील ज्यांना कुणालाही त्यांच्या परिसरात किंवा कॉलनीत वृक्षारोपण करायचे आहे त्यांनी एक फूट-एक फूट असा खड्डा खोदून ठेवायचा आहे. त्यानंतर संस्थेशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती द्यावयाची आहे. संस्थेचे पदाधिकारी ३ जुलै रोजी तेथे येणार व वृक्षारोपण करणार. विशेष म्हणजे, जेथे वीज वाहिनी असेल, भविष्यात नाली किंवा अन्य काही कार्य प्रस्तावित नाहीत तेथेच वृक्षारोपण केले जाणार आहे.