गोंदिया : ऑनलाइन पीकविमा भरताना येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे यापासून वंचित राहणार अशी धाकधूक शेतकऱ्यांना लागून होती. मात्र आता त्यांना चिंता करण्याची गरज नाही. कारण, शासनाने ऑनलाइन पीकविमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दि. ३ ऑगस्टपर्यंत पीकविमा भरता येणार असल्याने घाई करण्याची काहीच गरज राहिलेली नाही.
नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊन पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्याकडे पाठ केली होती. ही बाब लक्षात येताच राज्य शासनाने १ रुपयांचा पीकविमा देण्याचा निर्णय घेतला. एक रुपयांचा पीकविमा या योजनेचे हे पहिले वर्ष असले तरी याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येत पुढे येत आहेत. मात्र यासाठी दि. ३१ जुलै ही शेवटची तारीख असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ वाढल्याचे दिसत आहे; तर जिल्ह्यातील १,८०,२३४ शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढल्याची माहिती आहे.
मात्र ऑनलाइन पद्धतीने एक रुपयांत पीकविमा काढत असताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली होती. त्यातच दि. ३१ जुलैपर्यंत पीकविमा काढता येणार असल्याने आणखीही कित्येक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार होते. परिणामी शेतकऱ्यांकडून पीकविम्याची तारीख वाढवून देण्याची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांच्या या हाकेला साद देत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मुदतवाढ करण्याची विनंती केली होती. परिणामी केंद्र शासनाने मुदतवाढ देण्यास हिरवी झेंडी दिल्याने आता पीकविमा काढण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना दि. ३ ऑगस्टपर्यंत पीकविमा काढता येणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना विनाकारण चिंता करण्याची गरज नसून तीन दिवसांत आरामात त्यांना पीकविमा काढता येणार असून, शेतकऱ्यांना संधी मिळाल्याने जिल्ह्यात पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढणार यात काही शंका वाटत नाही.
बापरे किती ही तफावत?मागील वर्षी खरिपात पीकविमासाठी ८७५ रुपये हेक्टरी भरावे लागले व तेव्हा जिल्ह्यातील फक्त १५ हजार ८११ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला होता. उधार उसनवारी व कर्ज घेऊन हंगाम पिकविणाऱ्या शेतकऱ्याला एवढी रक्कम भरणेही शक्य होत नव्हते. अशात निसर्गाचा लहरीपणा विमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांना भोगावा लागत होता. यामुळेच एकही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने एक रुपयांत पीकविमा योजना काढली. त्याचे फलित असे की, यंदा दि. ३१ जुलैपर्यंत १,८०,२३४ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्यात आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने ही संख्या आणखी वाढणार असल्याचे दिसते.
तिरोडा तालुका आघाडीवर- ३१ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १,८०,२३४ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. यात तिरोडा तालुक्यातील शेतकरी आघाडीवर दिसत असून, तेथील ३८,४६० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. दुसऱ्या क्रमांकावर गोंदिया तालुका असून, येथील ३३,८९६ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे; तर तिसऱ्या क्रमांकावर अर्जुनी-मोरगाव तालुका असून, तेथील २१,९८३ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, तर नक्षलग्रस्त सालकेसा तालुक्यात सर्वात कमी ११,०८५ शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतल्याचे दिसत आहे.
पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा तालुकानिहाय तक्तातालुका - शेतकरीआमगाव- १७,०४१अर्जुनी-मोरगाव- २१,९८३
देवरी- १८,७०५गोंदिया- ३३,८९६
गोरेगाव-२१,७८४सडक-अर्जुनी- १७,२८०
सालेकसा-११,०८५तिरोडा- ३८,४६०
एकूण-१,८९,२३४