लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मतदानाच्या दिवशी मतदारांचा वेळेवर गोंधळ उड्डू नये, ते मतदानापासून वंचित राहू नये, लोकसभेत झालेल्या चुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये याची जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे काळजी घेतली आहे. तुमचे नाव नेमके कुठल्या मतदान केंद्रावर आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर गोंधळून जाऊ नका, तुम्ही केवळ तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर कॉल करा, तुम्हाला लगेच तुमचे नाव कुठल्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती मिळेल असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सोमवारी (दि.१८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील उपविभागीय कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी माहिती देताना सांगितले की मतदानाच्या ४८ तासांपूर्वी उमेद्वारांना जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्याअनुषंगाने गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजता व अर्जुनी मोरगाव व आमगाव मतदारसंघात दुपारी ३ वाजता जाहीर प्रचार बंद करण्यात आला. २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदान होणार आहे. अर्जुनी मोरगाव आणि आमगाव मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ आणि गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता ही मतदानाची वेळ आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रावर मतदारांची कुठलीही गैरसोय आहे. सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर रांगा लागू नये याची सुद्धा काळजी घेण्यात आली. लाईट्स व तंबूची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
६४५० कर्मचाऱ्यांनी बजाविला पोस्टल बॅलेटद्वारा मतदानाचा अधिकारनिवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चारही मतदारसंघात साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांचे पोस्टल बॅलेट मतदान घेण्यात आले आहे. चारही मतदारसंघात नियुक्त ६४५० कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट मतदानाचा हक्क बजाविला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
११ लाख २५ हजार मतदार बजाविणार मतदानाचा हक्कजिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकूण ११ लाख २५ हजार १०० मतदार आहेत. २० नोव्हेंबरला सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी दोन दिवसांत सर्व मतदारांना मतदान चिकूचांचे वाटप करण्यात आले. तसेच मतदार केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मतदारांसाठी विधानसभानिहाय मदत केंद्रअर्जुनी मोरगाव : ०७९६-२२०१४६तिरोडा : ०७१९८-२९९०२०गोंदिया : ०७१८२-२३६७०३आमगाव : ०७१९९-२९५२९६
मध्यप्रदेश, छत्तीसगड पोलिस दलाची मदत विधानसभा निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस विभागाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. तसेच लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. - संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिस जवानांची नियुक्त्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले.