सडक-अर्जुनी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या वतीने १ मेपासून १८ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील युवकांनी या लसीकरणाचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा. कोरोना लसीकरणासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न युवा वर्गाने करावा, असे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री हर्ष मोदी यांनी कळविले आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार संपूर्ण देशात १ मेपासून १८ वर्षे वयोगटातील सर्व नागरिक लसीकरणासाठी पात्र असल्याने लाभार्थ्यांची संख्या पाहून जिल्हा प्रशासन व्यापक लसीकरणाच्या तयारीला लागले आहे. यात पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कोरोना योद्धे, ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील सर्व व ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील वर्ग जे आजाराने ग्रस्त नागरिकांना लसीकरण केल्यानंतर आता सर्वांत मोठे लसीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागात लसीकरणास घेऊन अफवांचे बाजार सुरू झाले आहेत. नागरिकांमध्येही लसीसंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अफवांना बळी न पडता नागरिकांनी बिनधास्त लसीकरण करावे, असे हर्ष मोदी यांनी कळविले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य कर्मचारी यांनी जनजागृती करून समाजास लसीकरणासाठी प्रेरित करावे. लसीकरणादरम्यान नोंदणीसाठी प्रत्येक तालुक्यात युवा मोर्चाच्या वतीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.