लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : एखाद्याचा रक्तगट दुर्मिळ असल्यास त्याला त्याच रक्तगटाच्या दात्याचा शोध घेणे हे किती अवघड जाते, याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकले व वाचले असतील. असाच एक किस्सा गोंदिया जिल्ह्यात घडला. मात्र यात पोलिस व त्याच्या पत्नीने तात्काळ निर्णय घेऊन पुढाकार घेत रक्तदान केल्याने एका युवतीचे प्राण वाचले.
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल एका युवतीला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र रक्तपेढीत तुटवडा असल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. दरम्यान याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना मिळाली. त्यांचा पत्नीचा रक्तगट एबी निगेटिव्ह असल्याने त्यांनी पत्नीसह लोकमान्य ब्लड बँक गाठून त्यांच्या पत्नीने रक्तदान केले. वेळीच रक्त मिळाल्याने युवतीचे प्राण वाचविणे शक्य झाले.
कोरोनामुळे सध्या रक्तदान शिबिरे बंद आहे. तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुध्दा व्यापक स्तरावर सुरु आहे. त्यामुळे येथील रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बरेचदा गरजू रुग्णांसाठी रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. असाच प्रकार शुक्रवारी (दि.३०) बाई गंगाबाई महिला रुग्णालयात घडला. या रुग्णालयात दाखल असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र गोंदिया रक्तपेढीत आणि खासगी रक्तपेढीत सुध्दा या रक्ताचा साठा नव्हता. त्यामुळे या तरुणीचा जीव धोक्यात आला होता. दरम्यान यासाठी अनेक स्वंयसेवी संस्थाशी संपर्क करण्यात आला.
गोंदिया येथील रक्त मित्र गुड्डू चांदवानी यांच्याकडे रक्तदात्यांची यादी होती. त्या यादीतील काही व्यक्तींशी संपर्क साधला. चांदवानी यांनी संदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्याशी संपर्क साधृून त्यांना याची माहिती दिली. तायडे लगेच त्यांच्या पत्नीचा रक्तगट एबी निगेटिव्ह असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी पत्नी किरणसह लोकमान्य ब्लड बँक गाठून रक्तदान केले. तायडे यांच्या पत्नीने वेळीच रक्तदान केल्याने त्या तरुणीचे प्राण वाचविणे शक्य झाले. एबी निगेटिव्ह रक्त हे फारच दुर्मिळ समजले जाते. मात्र रक्तदान हे महान दान समजून वेळीच माणुसकीचा परिचय देत किरण तायडे यांनी रक्तदान केल्याने तरुणीला नवसंजीवनी मिळाली. रक्त मित्रांमुळे झाली मदत येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात नेहमीच रक्ताचा तुटवडा पडतो. अशावेळी शहरातील अनेक स्वंयसेवी संस्थाचे पदाधिकारी व सदस्य रक्तदान करण्यासाठी धावून येतात. ते रक्तमित्र म्हणून काम करीत असतात. विनोद चांदवानी, रवी बोधानी, नितीन रायकवार या रक्तमित्रांमुळे युवतीचे प्राण वाचविणे शक्य झाले. कोणत्याही नात्यापेक्षा माणुसकीचे नाते हे सर्वात महत्वाचे आहे. संकट काळात मदतीला धावून जाणे यालाच माणुसकी म्हणतात हाच दृष्टीकोन बाळगून मी सुध्दा रक्तदान केले. गरजूंना रक्तदान करण्यासाठी इतरांनी सुध्दा निसंकोचपणे पुढे येण्याची गरज आहे. - किरण तायडे (रक्तदाता)