गोंदिया : समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून एक जोड गणवेश देण्यात आले आहेत. तर आता दुसऱ्या गणवेश जोडासाठी निधी देण्यात आला आहे. गणवेश वितरणाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडेच राहणार आहे. मात्र गणवेशाच्या या जोडात आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट देण्याचे निर्देश आहेत. यामुळे आता विद्यार्थी एकसारख्या रंगातील गणवेशात दिसणार आहेत.
शासनाने शिक्षणाचा अधिकार अमलात आणला असून एकही विद्यार्थीशिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर शिक्षणाचा बोजा येऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकेही दिली जातात. यामध्ये गणवेश सर्व मुली, अनु. जाती मुले, अनु. जमाती मुले तसेच दारिद्य्र रेषेखालील पालकांच्या मुलांनाच दिले जातात. दरवर्षी दोन जोड मोफत गणवेश दिले जात असून, त्यातील एक जोड गणवेशाची सोय शासनाकडून शाळा सुरू होण्यापूर्वीच करून देण्यात आली होती. तर दुसऱ्या जोडसाठी लक्ष लागून होते.
शात आता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून गणवेशाच्या दुसऱ्या जोडसाठी जिल्हा परिषदेला निधी देण्यात आला आहे. मात्र असे असतानाच गणवेशाच्या या जोडमध्ये आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. गणवेशाचा पहिला जोड देताना त्याचा रंग ठरविण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले होते. मात्र दुसरा जोड ठरवून देण्यात आलेल्या रंगाचाच असावा, असे बंधनकारक करण्यात आले आहे. हा गणवेश तयार करण्याची जबाबदारीही शाळा व्यवस्थापन समितींनाच देण्यात आली आहे.
राज्य शासनाची संकल्पना
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी एकसारख्या रंगातील गणवेशातच दिसावेत, अशी राज्य शासनाची संकल्पना आहे. त्यानुसार, राज्य शासनाकडून गणवेशाच्या दुसऱ्या जोडचे वाटप करताना आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट देण्यात यावी, अशी अट टाकण्यात आली आहे. जेणेकरून सर्व विद्यार्थी एकसारख्या रंगातील गणवेशात आता दिसतील. विशेष म्हणजे, यंदा सत्र सुरू होऊन जेमतेम १०-१२ दिवसांचा कालावधी लोटला असतानाच गणवेशाच्या दुसऱ्या जोडसाठी निधी देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ८३,०३३ विद्यार्थी पात्र
- जिल्ह्यात यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८३,०३३ एवढी नोंदविण्यात आली होती व त्यानुसारच गणवेशाच्या पहिल्या जोडसाठी ३०० रुपयांप्रमाणे निधी देण्यात आला होता. तर आता दुसऱ्या जोडसाठी सुद्धा हीच संख्या धरण्यात आली असून जिल्ह्याला २,४९,०९,९०० रुपये देण्यात आले आहेत. लवकरच हा निधी तालुकास्तरावर वितरित केला जाणार आहे. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितींना दिला जाणार व त्यांच्याकडून गणवेशाची तयारी केली जाईल.