अर्जुनी मोरगाव : आदिवासी ग्रामीण भागातील नवयुवक व महिलांमध्ये मैदानी खेळाच्या बाबतीत मोठे टॅलेंट आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत ग्रामीण भागातले नैपुण्य सिद्ध झाले आहे. आदिवासी ग्रामीण भागातील युवक, युवतींनी क्रीडा क्षेत्रात मेहनत करून नैपुण्य प्राप्त करावे व देशाचा नावलौकिक करावा, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यश बहुद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा शुक्रवारी (दि. १७) पवनी धाबे येथे युवक व महिलांसाठी आयोजित धाव स्पर्धा व विविध कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, पवनी धाबेच्या सरपंच पपिता नंदेश्वर, रामपुरीच्या सरपंच सुषमा बुडगेवार, कोहलगावच्या सरपंच माधुरी चांदेवार, आनंदराव डोंगरवार, पराग कापगते, नरेश आदमने, नरेश बुडगेवार, प्रल्हाद गहाणे, मोहित मसराम, डोकू दररो उपस्थित होते.
कांबळे यांनी सांगितले, ग्रामीण आदिवासी भागात प्रचंड टॅलेंट आहे. युवक व युवतींना त्यांच्यात असलेले क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत नाही. अशा भागात क्रीडा प्रशिक्षक नेमल्यास भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंची उपलब्धता होऊ शकते. शासन व लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेत अनेक धावपटू युवक व महिलांनी सहभाग घेतला होता. यात गोठणगावच्या मिलिंद कोवे याने ५००१ रुपयांचे प्रथम तर श्रीकांत किरसान याने ३००१ रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना किरण कांबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.