गोंदिया : राज्य शासनाने १८-४४ वर्षे वयोगटांच्या लसीकरणाला परवानगी देताच, जिल्ह्यातील या गटातील तरुणाईची लसीकरणाला घेऊन उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. या गटातील लसीकरणाचा आकडा झपाट्याने वाढत असून, मंगळवारपासून (दि.२२) आतापर्यंत तब्बल ७७,६०५ तरुणांनी लसीकरण करवून घेतले आहे. यामुळे सध्या लसीकरणात तरुणाईच आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
कोरोनाला मात देण्यासाठी देशात सध्या लसीकरणावर जोर दिला जात आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरणासाठी पूर्ण जोर लावला जात आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून, नागरिकांना लसीकरणासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे, मध्यंतरी काही मोजकेच दिवस १८-४४ गटांचे लसीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यावर बंदी आल्याने या गटातील तरुण व युवा लसीकरणासाठी परवानगीची आतुरतेने वाट बघत होते. अशात राज्य शासनाने १८ ऐवजी ३० प्लसला १९ जून रोजी परवानगी दिली व या गटातील आकडेवारी झपाट्याने वाढू लागली. आता २२ जूनपासून १८ प्लसला परवानगी मिळाल्याने, लसीकरणासाठी या गटातील तरुण व युवा लसीकरणासाठी पुढे येत आहेत. मंगळवारपर्यंत (दि.२९) या गटातील ७७,६०५ तरुणांनी लसीकरण करवून घेतले आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी लसीकरण केंद्रांवर गर्दी दिसून येत नव्हती. मात्र, आता तरुणांच्या गटाला परवानगी मिळाल्याने मोठ्या संख्येत तरुणांची गर्दी वाढली आहे.
--------------------------------
४५-६० गट प्रथम क्रमांकावर
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ४,३६,३६७ नागरिकांचे लसीकरण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर ४५-६० गट असून, यात १,९०,६४४ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर ६० प्लसचा गट असून, यात १,१४,८७० नागरिकांनी लसीकरण करवून घेतले आहे. त्यानंतर, सध्या १८-४४ हा गट तिसऱ्या क्रमांकावर असून, यात ७७,६०५ तरुणांनी लसीकरण करवून घेतले आहे. यामध्ये ७०,५९१ तरुणांनी पहिला डोस घेतला असून, ७,०१४ तरुणांनी दुसरा घेतला आहे.
------------------------------
लसीकरणासाठी पुढे या
राज्यात आता १८ प्लसचे लसीकरण सुरू झाले असून, कुणालाही आता वाट बघण्याची गरज राहिलेली नाही. परिणामी, तरुणवर्ग लसीकरणासाठी स्वेच्छेने पुढे येत असून, त्यांची आकडेवारी वाढत आहे. मात्र, त्यानुसार अन्य गटांतील नागरिकांनीही आपल्या मनातील भीती व भ्रम काढून लसीकरण करवून घेण्याची गरज आहे. यामुळे आता नागरिकांनी लसीकरणासाठी कुणाचीही वाट न बघता, स्वत: पुढाकार घेऊन लसीकरण करवून घ्यावे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविले जात आहे.
-------------------------------
जिल्ह्यातील लसीकरणाचा तक्ता
गट लसीकरण
आरोग्य कर्मचारी १६,३९८
फ्रंटलाइन वर्कर्स ३६,८५०
१८-४४ ७७,६०५
४५-६० १,९०,६४४
६० प्लस १,१४,८७०
एकूण ४,३६,३६७