दिलीप पाटील : बिजेपार येथील जनजागरण मेळावा बिजेपार : पोलीस विभागाद्वारे चालविण्यात येत असलेल्या पोलीस भर्तीपूर्व प्रशिक्षणामुळे परिसरातील युवकांचा फायदा झाला आहे. पुढे त्यांना यातून भविष्याच्या वाटा खुलतील. त्यामुळे युवकांनी वाईट विचारांपासून दूर राहून देश हितासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी केले. येथील सशस्त्र पोलीस दुरक्षेत्रात (एओपी) सालेकसा पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजीत दोन दिवसीय भव्य जनजागरण मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस देवरी कॅम्पचे डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जि.प. सदस्य लता दोनोडे, पं.स.सदस्य दिलीप वाघमारे, सरपंच नितू वालदे, पांढरवाणीचे सरपंच ओमप्रकाश धुर्वे उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थीकरिता सोई उपलब्ध व्हाव्या म्हणून प्रत्येक केंद्राला पाच लाख रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले. या जनजागरण मेळाव्यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व औषधांचे वितरण करण्यात आले. विविध विभागाकडून स्टॉल लावून शासकीय योजनांची माहिती सांगण्यात आली. तसेच रोजगार मार्गदर्शन केंद्राद्वारे नोंदणी करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी कार्यक्रमाला आलेल्या महिला व पुरुषांचे आभार मानले. (वार्ताहर)
युवकांनी देशहितासाठी कार्य करावे
By admin | Published: February 22, 2017 12:31 AM