गोंदिया : पुणे पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या सहकारी युवकाला पोलिसांनी गोंदियातून तीन दिवसांपुर्वी अटक केली होती. दरम्यान हा युवक सुध्दा दहशतवादी कारवायात सहभागी असल्याचे सांगत तो देखील दहशतवादीच असल्याचे गोंदिया पोलिसांनी गुरुवारी (दि.२८) सांगितले.
मुळचा गोंदिया येथील रहिवासी असलेला अब्दुल कादीर पठान (३५) हल्ली मुक्काम कोंढवा पुणे या युवकाला दोन दिवसांपुर्वी पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान प्राप्त पुराव्यावरुन दहशवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य यांनी पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला अटक केल्याच्या वृत्ताला गोंदिया पोलिसांनी दुजोरा दिला आहे. प्राप्त माहितीनुसार पुण्यातील कोथरूड परिसरात गेल्या आठवड्यात पोलिस रात्रीची गस्त घालत असताना मोहम्मद इम्रान मो. युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि मोहम्मद युनूस मो. याकूब साकी (वय २४) हो दोन जण गाडी चोरताना आढळले.
ते दोघेही कोंढव्यात दोघेही भाड्याच्या घरामध्ये होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या घरांची झडती घेतली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून पोलिसांनी आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. पोलिसांनी इम्रान व अमीर या दोघांचीही कसून चौकशी केली असता ते दोघेही वॉटेंड असल्याचे समोर आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, चार फोन, एक टब्लेट आणि काही पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले होते. त्यानंतर कोथरुड पोलिसांनी हा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे (एटीएस) वर्ग करण्यात आला होता. एटीएसच्या तपासात काही धक्कादायक माहिती पुढे आली. हे दोन्ही दहशतवादी पुण्यात बॉम्बस्फोट घडवणार होते. त्यासाठी या दोघांनी सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलामध्ये जाऊन बॉम्बस्फोट घडविण्याचे प्रशिक्षण आणि चाचणी देखील केल्याची माहिती पुढे आली आहे.
त्या दोन दहशवाद्यांना केली आर्थिक मदतअटक केलेले इम्रान व अमीर हे दोघेही काही काळ गोंदिया येथे थांबले होते. त्यांना येथे आश्रय देण्यासाठीची सोय करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्याला पुणे पोलिसांनी चार-पाच दिवसांपूर्वी गोंदिया येथे येऊन अटक केली. गोंदियातील सहकाऱ्याने इम्रान व अमीरला आर्थिक मदतही केल्याची माहिती आहे.