गोरेगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय पक्षाचे समर्थित कार्यकर्ते व स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपपल्या मतदार क्षेत्रात येणाऱ्या मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
निवडणूक विभागाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीचे संकेत दिले नसले तरी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उभे राहून बाजी मारण्यासाठी आपपल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती क्षेत्रात मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच लग्नसराई, छोटेखानी कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत. या कार्यक्रमात समाविष्ट मतदारांना मीच या जिल्हा परिषद क्षेत्रात निवडणूक लढणार असृून लक्ष असू द्या चा सूर आळवला आहे. गोरेगाव तालुक्याची दोन विधानसभा क्षेत्रात विभागणी झाली आहे. त्यामुळे मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात मुंडीपार, घोटी, निंबा हे तीन जिल्हा परिषद क्षेत्र येतात तर तिरोडा, गोरेगाव विधानसभा क्षेत्रात सोनी, शहारवाणी, कुऱ्हाडी जिल्हा परिषद क्षेत्राचा समावेश आहे. निंबा जिल्हा परिषद क्षेत्र नव्याने घोषित झाली आहे. निंबा गटग्रामपंचायत मोठी असून निंबा, पठाणटोला, हलबीटोला, चिचटोला, कन्हारटोला, पिपरटोला या गावांचा समावेश आहे.
......
अनेकांनी कसली कंबर
निंबा जि.प.क्षेत्रातून वर्षा पटले, डॉ. लक्ष्मण भगत, डॉ. किशोर गौतम यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुरदोलीचे सरपंच सशेंद्र भगत, ॲड पृथ्वीराज चव्हाण यांनी सुध्दा तयारी सुरु केली आहे. निंबा जिल्हा परिषद क्षेत्रात निंबा,चोपा पंचायत समिती क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. यात निंबा, तानुटोला, तिल्ली, मोहगाव, हौसीटोला, चांगोटोला, चोपा, पलखेडा, तेलंखेडी, घुमर्रा, पालेवाडा कलपाथरी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या क्षेत्रात १७ हजार ५०० मतदारांचा समावेश आहे.
......
मुंडीपार क्षेत्र महिलांसाठी राखीव
मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्राचे आरक्षण सर्वसाधारण महिला राखीव असल्याने माया चौधरी बाम्हणी, रत्नकला भेंडारकर रजनी धपाडे, त्रिवेणी बघेले, मोहाडी,ममता रहांगडाले बाम्हणी, लिना बोपचे म्हसगाव, ज्योती वालदे या उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी तयारी केली आहे.
......
राजकीय पक्षांकडून चाचपणी
मुंडीपार पंचायत समिती क्षेत्रात पिंडकेपार, हिरापुर, मलपुरी, मुंडीपार या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तेढा पंचायत समिती क्षेत्रात तेढा, तुमसर,बाम्हणी, मोहाडी,कमरगाव या ग्रामपंचायती येत असून मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्रात १७ हजार ३४७ मतदार आहेत. कोविड वाढता प्रभाव पाहता येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुका जाहीर होणार की नाही हा प्रश्न मतदारांसमोर असला तरी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयार सुरु केली आहे.