लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आटोपली असताना सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या निवडणुका ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १० तर पंचायत समितीच्या २० जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर या जागांची निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५१ व पंचायत समिती १०६ आणि नगरपंचायतीच्या ५१ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होणार होती. पण ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगर पंचायतीच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे; मात्र ओबीसीच्या जागा वगळून या निवडणुका घेण्यात येऊ नये असा सूर सर्वच पक्षांनी आवळला आहे. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांचा सुद्धा उत्साह कमी झाल्याचे चित्र आहे.
सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला - ओबीसी प्रवर्गाच्या जागांवर निवडणूक घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याच निर्णयाच्या आधारावर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. बोंडगावदेवी, केशोरी, महागाव, माहुरकुडा, इटखेडा या पाच जि.प.च्या जागांवरील निवडणूक स्थगित झाली आहे.
जि.प. च्या या जागांवरील निवडणूक स्थगित- ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या ठाणेगाव, निंबा, माहुरकुडा, महागाव, किकरीपार, घाटटेमनी, पांढरी, बोंडगावदेवी, इटखेडा, केशाेरी या जागावरील निवडणुकीला स्थगिती दिल्याने निवडणूक होणार नाही. पंचायत समितीच्या या २० जागांचा समावेश - राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक घेण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या ज्या जागांवर निवडणूक होणार नाही त्यात सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी व कोकणा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा, नवेगावबांध, सालेकसा तालुक्यातील कारुटोला, तिरोडा तालुक्यातील सेजगाव, चिरेखणी, चिखली, गोंदिया तालुक्यातील घिवारी, सावरी, रतनारा, डोंगरगाव, पिंडकेपार, कुडवा, खमारी आणि गोरेगाव तालुक्यातील गणखैरा, हिरडामाली, मुंडीपार व आमगाव तालुक्यातील कट्टीपार व अंजोरा या पंचायत समिती क्षेत्राचा समावेश आहे. नगरपंचायत सहा जागांना निवडणूक स्थगिती- जिल्ह्यातील देवरी, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या ५१ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होणार होती; मात्र आता ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक होणार असल्याने नगरपंचायत एकूण ४५ जागांसाठीच निवडणूक होईल. यात सडक अर्जुनी नगरपंचायतच्या ३, अर्जुनी मोरगाव १ आणि देवरी नगरपंचायतच्या २ अशा एकूण सहा जागांची निवडणूक होणार नाही.