लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : युतीचा त्रिकोण करून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांमध्ये आता विषयी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीवरून चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. दोन अपक्ष सदस्यांना प्रत्येकी अडीच अडीच वर्षं सभापतिपद वाटून दिले जाणार आहे. यासाठी आधी सभापतिपदी कोण विराजमान होणार? यासाठी या दोन्ही सदस्यांना आपसांत टॉस करावा लागणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी पार पडली. त्यानंतर जि.प.च्या पाच विषयी समिती सभापतिपदासाठी सोमवारी (दि.२३) रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि दोन अपक्ष सदस्यांना सोबत ४० सदस्यांचा आकडा गाठत सत्ता स्थापन केली. यात अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. त्यानंतर आता पाच विषय समिती सभापतिपदांसाठी सोमवारी निवडणूक होत आहे. यात भाजप अर्थ व बांधकाम आणि आरोग्य व शिक्षण हे दोन्ही महत्त्वपूर्ण विभाग स्वत:कडे ठेवूून घेणार आहे. तर अपक्ष सदस्यांना एक आणि चाबी संघटनेला एक सभापतिपद दिले जाणार आहे. समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि कृषी व पशुसंवर्धन यापैकी कोणते सभापतिपद नेमके कुणाला द्यायचे, सभापतिपदी कोणत्या सदस्यांची वर्णी लावायची हे अद्यापही निश्चित झालेले नाही. याचा निर्णय रविवारी रात्री होणार असल्याची माहिती आहे. पण दोन अपक्ष सदस्यांना सभापती मिळणार हे निश्चित आहे. त्यांना प्रत्येकी अडीच अडीच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. पण यासाठी त्यांना आधी सभापती कोण विराजमान होणार, याचा निर्णय आपसांत ठरवून घ्यावा लागणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागणार असून, त्यांच्या वाट्याला कृषी व पशुसंवर्धन विभाग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाराजी टाळण्यासाठी तासभर आधी नावे - विषय समिती सभापतिपदाची निवडणूक सोमवारी होत आहे. या निवडणुकीत सभापतिपदी नेमकी कुणाची वर्णी लावायची हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निश्चित केले आहे. पण, त्यांची नावे आत्ताच जाहीर न करता निवडणुकीच्या तासभरापूर्वी जाहीर करायची, अशी भूमिका घेतली आहे. हा सर्व खटाटोप केवळ सदस्यांमध्ये ऐनवेळी फूट पडू नये यासाठीच असल्याची माहिती आहे.
चाबी कुणाला देणार संधी - भाजपसह जिल्हा परिषदेत सत्तेत सहभागी असलेल्या चाबी संघटनेला एक सभापतिपद मिळणार, हे निश्चित आहे. मात्र, यासाठी चाबी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील चारपैकी कोणत्या एका सदस्याला संधी देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काँग्रेस पार पडणार विरोधकाची भूमिका - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि चाबी संघटना असे ४० सदस्य एकत्र आले. त्यामुळे सभागृहात काँग्रेसचे १३ सदस्य विरोधी बाकावर बसणार असून ते विरोधकांची भूमिका पार पाडणार आहे.
जि.प.आड विधान परिषदेची तयारी- भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे समीकरण जुळविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी काहीही झाले तरी अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन चालायचे अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी चाबी संघटना आणि दोन अपक्ष सदस्यांना सभापती देण्याचा फाॅर्म्यूला एका आमदाराने तयार केला असल्याची माहिती आहे.