फुक्कीमेटा प्रकरण : तीन सदस्यीय समिती गठितगोंदिया : जिल्हा परिषदेद्वारे चालविण्यात येणाऱ्या फुक्कीमेटा (आमगाव) शाळेतील शिक्षकाकडून झालेला लैंगिक छळाचा प्रकार गंभीर आहे. ज्या शाळेत तीन शिक्षिका व दोन शिक्षक कार्यरत आहेत, त्या शाळेत हे घडावे हे आश्चर्यकारक असून त्या तीनही शिक्षिकांच्या भूमिकेची तपासणी करण्याची मागणी स्थायी समितीच्या सभेत झाली. त्यानुसार जि.प.च्या कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी वंदना शिंदे यांचे नेतृत्वात तीन सदस्य समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले. स्थायी समिती सभा १३ एप्रिल २०१६ ला अध्यक्ष मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती पी.जी. कटरे, देवराव वडगाये, छाया दसरे, विमल नागपुरे, सीईओ दिलीप गावडे यांचे शिवाय समिती सदस्य गंगाधर परशुरामकर सुरेश हर्षे, उषा शहारे, रमेश अंबुले, अल्तापभाई, रजनी कुंभरे व इतर सदस्य तथा सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. फुक्कीमेटा शाळेतील प्रकरणामुळे जि.प.ला शरमेने मान खाली घालावी लागली. ३ शिक्षिका असूनही या शाळेतील २ शिक्षिकांनी असे घृणास्पद कृत्य करावे हे संशयास्पद असून या शाळेची वरोरा येथे गेलेली सहल व जैतुरटोला येथील क्रीडा सत्रातील घडलेला प्रकार पाहता तेव्हा या शिक्षिका कुठे होत्या? असा प्रश्न परशुरामकर यांनी केला. महिला सदस्याची समिती स्थापन करुन या महिला शिक्षिकांच्या संशयास्पद वागणुकीची चौकशी करुन अहवाल सादर करावा अशी मागणी केली. तेव्हा अध्यक्ष उषा मेंढे यांनी सदर मागणी मान्य करुन कृषी विकास अधिकारी शिंदे, विस्तार अधिकारी सांख्यीकी वैशाली खोब्रागडे आणि अर्जुनी मोरगाव येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती हवेली अशा तीन अधिकाऱ्यांची समिती गठीत करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी चर्चेत सुरेश हर्षे यांनी भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यावर्षी उन्हाळी धानाचे पिक घेतले जात असून ९९ टक्के भातपिक हे शेतात खोदलेल्या विंधन विहीरीच्या उपलब्ध पाण्यावरुन घेण्यात येत आहेत. विंधनविहीरीची खोली ३०० फुटाच्या जवळपास असून शासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी गावात खोदलेल्या विहीरी १५० ते १७५ आहे. शेतातील विहिरी जास्त खोल असल्याने त्याच्यावरील पंप सुरू केल्यानंतर गावातील विहिरी कोरड्या पडतात व त्यामुळे यावर्षी असंख्य गावात तिव्र आणि पाणी टंचाई जाणवत आहे. यावर जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा योजना काही उपाय योजना करणार आहे का, असा प्रश्न परशुरामकर व सुरेश हर्षे यांनी उपस्थित करताच या संबंधी जि.प. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.याशिवाय गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर झालेला हल्ला हा लोकशाहीला कंलक असल्याने याचा निषेध करण्याचा प्रस्ताव समिती सदस्य रमेश अंबुले यांनी ठेवला. तो निषेधाचा ठराव सर्वानुमते पारीत केला.या सभेत महा. ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रश्नही बराच गाजला. सन २०१४ मध्ये वडेगाव (बंड्या) ता. मोरगाव अर्जुनी व २०१५ मध्ये जांभळी ता. सडक अर्जुनी यांनी कामे करुनही मजुरांना अजूनपर्यंत मजुरी मिळाली नसल्याचे तसेच तांत्रिक पॅनलचे अभियंते कामाचे आराखडे तयार करीत नसल्याने अनेक ग्राम पंचायतीमध्ये अजूनपर्यंत कामाची सुरुवात झाली नाही असे परशुरामकर यांनी लक्षात आणून देताच ८ दिवसात कारवाई करण्याचे सीईओ गावडे यांनी सांगितले. याशिवाय सुरेश हर्षे यांनी घरकुल, आंतरजिल्हा बदली प्रकरण, एमआरईजीएस अंतर्गत करण्यात येणाऱ्या बोर बाब अलताफभाई व उषा सहारे देवरी येथील विशेष घटक योजनेतील निधीवाटपात झालेला घोटाळा यावरही गंभीर चर्चा केली. (जिल्हा प्रतिनिधी)
‘त्या’ शिक्षिकांच्या भूमिकेची जि.प. चौकशी करणार
By admin | Published: April 17, 2016 1:35 AM