लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात साधारणपणे १०० कॅन्सर रुग्णांमध्ये १० ते १२ रुग्ण फुप्फुसाच्या कॅन्सरने पीडित आहेत. यातील ९० टक्के फुप्फुसाचा कर्करोग हा धूम्रपानामुळे होतो, असे निरीक्षण ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट व डॉ. परिमल देशपांडे यांनी नोंदविले. सोबतच कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपान व प्रदूषण टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला.
१ ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक फुप्फुस कर्करोग (लंग कॅन्सर) दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी जवळपास ७० हजार नव्या फुप्फुसाच्या कॅन्सर रुग्णांची भर पडते. यात महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे. डॉ. अरबट म्हणाले की, ‘लंग कॅन्सर’चे सर्वात मोठे कारण हे धूम्रपान आहे. अन्य कारणांमध्ये आनुवांशिकता, प्रदूषण किंवा प्रदूषित हवेत सततचा वावर, मग तो कंपन्यांमध्ये असो, वा वातावरणातील असो. याशिवाय, दीर्घकालीन फुप्फुसांचे विकार आदी, या कॅन्सरला कारणीभूत ठरतात.
२०३० पर्यंत लंग कॅन्सरचे प्रमाण वाढण्याची शक्यतासध्या भारतात एकूण कॅन्सरमध्ये १० ते १२ टक्के लंग कॅन्सरचे रुग्ण आढळून येत असले तरी २०३० पर्यंत हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. कर्करोगाचा संसर्ग एकाच फुप्फुसात झाला तर उपचारांनी तो बरा होतो. परंतु दोन्ही फुप्फुसांमध्ये कॅन्सर पसरला तर धोका वाढतो.
या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोश्वसनरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल बाकमवार म्हणाले, फुप्फुसांच्या कर्करोगाच्या पूर्वलक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला व कफ असणे, खोकल्याद्वारे आणि कधी थुंकीद्वारे रक्त येणे, श्वास घेताना त्रास होणे, आवाजात बदल होणे, सतत फुप्फुसाचे इन्फेक्शन व न्यूमोनिया होणे. सोबतच दीर्घकाळ ताप असणे, अशक्तपणा, वजन कमी होणे ही लक्षणेही आढळून येतात.
चौथ्या स्टेजमध्ये वाढते गुंतागुंतीचे प्रमाणश्वसनरोग तज्ज्ञ डॉ. परिमल देशपांडे म्हणाले, या कर्करोगामध्ये तिसऱ्या स्टेजपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके आहे. चौथ्या टप्प्यात मात्र गुंतागुंत वाढते. यामुळे लक्षणे दिसताच निदान होणे व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.
‘पॅसिव्ह स्मोकिंग’, जो सिगारेटमधून निघणारा धूर आणि धूम्रपान करणाऱ्याने सोडलेला धूर यांचे मिश्रण आहे. जेव्हा तुम्ही ते ‘इनहेल’ करता, तेव्हा तुम्ही धूम्रपान करणाऱ्यांसारख्याच कर्करोगास कारणीभूत घटकांच्या संपर्कात असता.- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ