लोकांना स्मार्टफोनचं किती वेड लागलंय हे काही वेगळं सांगण्याची आता गरज राहिली नाही. इतकंच काय तर अनेक महिलांसाठी मोबाइल फोन हा सवत ठरत आहे, असे जोक्सही सुपरहिट झाले आहेत. सतत मोबाइल स्क्रीनच्या संपर्कात राहिल्याने होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलही अनेकदा सांगण्यात येतं. मात्र याकडे फार कुणी लक्ष देत नाही. तुम्हीही सतत मोबाइल स्क्रीनच्या संपर्कात राहत असला तर तुम्ही तायवानमधील मुलीसोबत घडलेल्या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
२५ वर्षीय चेन नावाची ही तरूणी दक्षिण तायवानच्या काऊशुंग शहरातील आहे. गेल्या २ वर्षांपासून ती मोबाइल पूर्ण ब्रायटेनससोबत वापरत होती. चेन ने आता दावा केला आहे की, याकारणाने तिच्या डोळ्यांच्या कॉर्निया म्हणजेच डोळ्याच्या बाहुलीच्या पारदर्शक पडद्याला ५०० छिद्र पडली आहेत. चेनचं म्हणणं आहे की, मायक्रोवेव्हमुळे जसं भाजतं तसं तिच्या डोळ्यांचं मोबाइलमुळे झालं आहे.
रिपोर्ट्सनुसार, चेन एका कार्यलयात सेक्रेटरी म्हणून काम करते. त्यामुळे तिला सतत फोनवर अॅक्टिव रहावं लागतं. पण ती सतत तिच्या फोनचं ब्राइटनेस फूल ठेवत होती. अशाप्रकारे तिने २ वर्ष फोनचा वापर केला.
दोन वर्षांनी चेनला जाणवलं की, तिच्या डोळ्यात काहीतरी समस्या आहे. त्यानंतर तिने अनेक डोळ्यांच्या तज्ज्ञांची भेट घेतली. वेगवेगळे आय ड्रॉप्स वापरलेत. पण तिच्या डोळ्यांची समस्या काही कमी झाली नाही. हळूहळू डोळ्यात होणाऱ्या वेदनांसोबत तिला डोळ्यात ब्लडशॉट होऊ लागलं. नंतर तिला बघण्यातही अडचण येऊ लागली.
त्यानंतर पुन्हा चेन रूग्णालयात गेली, इथे तिला डॉक्टरने सांगितले की, तिच्या उजव्या डोळ्यातील कॉर्नियामध्ये तब्बल ५०० छिद्रे झाली आहेत. आता तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचा सल्ला आहे की, जर तुम्ही रात्री मोबाइलचा वापर करत असाल तर रूममधील लाइट बंद करू नका. तसेच डॉक्टरांनी हेही सांगितले की, ३०० Lumens लाइट डोळ्यांसाठी योग्य आहे. पण चेन ही ६२५ Lumens वर मोबाइलचा वापर करत होती.