धकाधकीची जीवनशैली आणि सततचा ताण यामुळे अनेकदा आपण आपल्या फिटनेसकडे दुर्लक्षं करतो. अनेकजण स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिमचा आधार घेत असतात. आपल्या दिवसभराच्या कामातून वेळ काढून जिममध्ये काही तास घाम गाळल्यानंतर शरीरातील सर्व एनर्जी संपून जाते. अशातच शरीराला पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते. जर तुम्ही डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश केला नाही तर त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो आणि बॉडी बनण्याऐवजी तुमचं वजन कमी होण्यास सुरुवात होते. जिममध्ये आपल्याला आपल्या ट्रेनरकडून योग्य डाएट प्लॅन तयार करून देण्यात येतो. पण फक्त त्यावर अवलंबून राहिल्यामुळे कधी कधी शरीराला योग्य लाभ मिळत नाही. तुम्हाला जर तुम्ही जिममध्ये करत असलेल्या वर्कआउटचा आणि त्यासोबत घेत असलेल्या डाएटचा योग्य फायदा पाहिजे असेल तर, तुम्ही स्वतः तुमच्या व्यायामावर आणि डाएटवर लक्ष देणं गरजेचं असतं. वर्कआउटच्या 30 मिनिटांनंतर काही अशा गोष्टींचं सेवन करा ज्या तुम्हाला फिट करण्यासाठी मदत करतात.
वर्कआउट केल्यानंतर 30 मिनिटांनी या पदार्थांचं सेवन करा :
1. प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थ
जर तुम्हालाही बॉलिवूडच्या अॅक्टर्सप्रमाणे फिट आणि आकर्षक बॉडी तयार करण्याची इच्छा असेल तर, तुम्हाला प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करणं फायद्याचं ठरतं. प्रोटीन्सशिवाय तुम्ही कितीही वर्कआउट केलं तरिही तुमच्या मसल्सला फायदा होणार नाही. काही लोक वर्कआउटसोबतच प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन शेक घेतात. परंतु याऐवजी जर तुम्ही खाद्यपदार्थांमधून शरीराला असलेल्या प्रोटीनची गरज पूर्ण केली तर ते जास्त फायदेशीर ठरतं. अनेकदा असे शॉर्टकट्समुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
वर्कआउट केल्यानंतर शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते, त्यासाठी तुम्ही अंडी, मासे, चिकन, पनीर, दूध, दही इत्यादी डाएटमध्ये पदार्थांचा समावेश करू शकता. जर तुम्ही मांसाहारी असाल तर वर्कआउट केल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 अंडी खाउ शकता.
2. शरीराला असते कार्बोहायड्रेटची गरज
प्रोटीनसोबत वर्कआउट केल्यानंतर आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते. वर्कआउट दरम्यान आपल्या शरीरातून ग्लायकोजन नावाचं तत्व घटण्यास सुरुवात होते. जास्त पळाल्यामुळे किंवा पोहल्यामुळे हे तत्व आणखी वेगाने घटण्यास सुरुवात होते. पण हे तत्व शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे वर्कआउटनंतरही शरीरातील हे तत्व टिकवून ठेवण्यासाठी कार्बोहायड्रेटचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
तज्ज्ञांच्या मते, आपल्याला शरीराच्या वजनानुसार, कार्बोहायड्रेट घेणं आवश्यक असतं. एक किलोग्राम वजनाच्या तुलनेत शरीराला 1.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घेण्याची आवश्यकता असते. बटाटे, ओट्स, तांदूळ, हिरव्या पालेभाज्या इत्यादी पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स उत्तम प्रमाणात असतात.
3. फॅट्स असलेले पदार्थ
तुम्ही जेवढं तुमच्या मसल्स वाढविण्यावर लक्ष केंद्रित कराल, तेवढीच बॉडि तयार होण्यासाठी मदत होईल. वजन वाढवून वर्कआउट केल्याने टोन्ड बॉडि मिळण्यास मदत होते. परंतु याचा अर्थ असा नाही की, तुम्ही जास्त तेलकट पदार्थांचा आहारात समावेश करण्यास सुरुवात कराल.
तुमच्या शरीराला चांगल्या फॅट्सची आवश्यकता असते. दूध किंवा दूधाचे पदार्थ, नट्स, नट्सपासून तयार करण्यात आलेलं बटर, ड्रायफ्रुट्स इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्हाला हेल्दी फॅट्स मिळण्यास मदत होते. या पदार्थांमध्ये असलेलं हेल्दी फॅट्स असतात. जे शरीराला एनर्जीसोबतच स्नायूंसाठीही फायदेशीर ठरतात. परंतु लक्षात ठेवा, याचं सेवन करत असाल तर वर्कआउट करणं थांबवू नका. जर तुम्ही वर्कआउट करणं बंद केलं तर तुमचं वजन वाढू शकतं.
टिप : तुम्ही जर कोणतंही हेव्ही डाएट प्लॅन फॉलो करण्याच्या विचारात असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करा.