उन्हाळा सुरू झाला की, उन्हामुळे आणि घामाने सर्वच हैराण झालेले असतात. उन्हाचे चटके आणि घामासोबतच उन्हाळा काही रोगांनाही सोबत घेऊन येत असतो. अशात आरोग्याची काळजी घेणं खूप आवश्यक असतं. जर या रोगांकडे लक्ष दिलं नाहीतर त्याचे गंभीर परीणाम होऊ शकतात. या दिवसात कोणते आजार होऊ शकतात आणि त्यांची काळजी कशी घ्यायची हे बघुया.
1) डिहायड्रेशन
मानवी शरीरात पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात ठेवणं या दिवसात गरजेचं असतं. रोज जवळपास 8 ते 10 ग्लास पाणी पिणे गरजेचं आहे. या दिवसात कमी पाणी पिणे आणि जास्त वेळ उन्हात राहणे यामुळे डिहायड्रेशनची समस्या होण्याची शकता अधिक असते. डिहायड्रेशनमुळे मेंदु, किडनी, मांसपेशी आणि ह्रदयाला नुकसान होऊ शकतं. चक्कर येणं, अशक्तपणा वाटणं आणि तहान लागणं ही डिहायड्रेशनची लक्षणे आहेत.
2) वायरल फीवर
जास्त ताप, अंगदुखी, घशात खवखवणे, सर्दी, डोकं दुखणे हे या रोगाची लक्षणं आहेत. हा त्रास तुम्हाला एक आठवडा होऊ शकतो. हा त्रास टाळण्यासाठी योग्य प्रमाणात हलक्या पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे.
3) डायरिया
हा आजार या दिवसात बाहेरील पदार्थ खाल्ल्याने होण्याची शक्यता अधिक असते. पोटावर सूज येणे, पोट दुखणे, सतत टॉयलेटला जावं लागणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराचे परीणाम अनेकदा गंभीर बघायला मिळतात. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगले.
4) मायग्रेन -
डॉक्टरांनुसार गरमीमुळे डोकेदुखी आणि मायग्रेन समस्या अधिक भेडसावू शकते. गरमीमुळे रक्तनलिका आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदुला होणारा रक्त पुरवठा कमी होतो. यात डोकेदुखी समोरच्या बाजूने सुरू होऊन मागच्या बाजूपर्यंत जाते. जास्त वेळ उन्हात घालवल्याने ही समस्या अधिक जाणवते.