High Protein Rich Dal : भारतीय आहारामध्ये डाळींचं फार महत्व असतं. लोक रोज वेगवेगळ्या डाळींचं सेवन करतात. डाळींची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. जर तुम्ही मांसाहार करत नसाल तर तुम्हाला डाळींमधून भरपूर प्रोटीन मिळू शकतं. डाळी शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहेत. आज आम्ही तुम्हाला पाच अशा डाळींबाबत सांगणार आहोत ज्यात भरपूर प्रोटीन असतं.
मसूरची डाळ
मसूरच्या डाळीचं सेवन करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. प्रोटीनसाठी मसूरची डाळ तुम्ही सालीसोबत किंवा सालीशिवायही सेवन करू शकता. मसूरच्या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन बी२, फोलिक अॅसिड, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम भरपूर असतं.
चण्याची डाळ
चण्याच्या डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं. तसेच याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. प्रोटीनसोबतच या डाळीमध्ये फायबरही भरपूर असतं, ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि पोटही साफ राहतं. इतकंच नाही तर चण्याच्या डाळीचं सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. चण्याच्या डाळीचं सेवन करून शरीरात लाल रक्तपेशी वाढण्यासही मदत मिळते.
मूग डाळ
तूर डाळीनंतर मूग डाळ ही सगळ्यात फायदेशीर मानली जाते. या डाळीच्या सेवनाने शरीराला प्रोटीन तर मिळतंच, सोबतच तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. या डाळीच्या सेवनाने पोटाच्या अनेक समस्याही दूर होतात. तसेच या डाळीने शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं.
उडीद डाळ
उडीद डाळ अनेक दृष्टीने शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन बी सुद्धा भरपूर असतं. जर प्रोटीनची कमतरता दूर करायची असेल तर या डाळीचा रोजच्या आहारात समावेश करावा. तसेच या डाळीमध्ये फोलिक अॅसिड, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्वही भरपूर असतात. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत राहतं.
तूर डाळ
तूर डाळीमध्येही प्रोटीन भरपूर असतं. इतकंच नाही तर या डाळीमध्ये फायबर फोलिक अॅसिड, आयर्न आणि कॅल्शिअमही भरपूर असतं. ही डाळ रोज खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन वाढतं. तसेच तूर डाळीच्या सेवनाने डायबिटीस आणि हृदयरोग कंट्रोल करण्यासही मदत मिळते. तसेच तूर डाळीचं पाणी सेवन केल्याने शरीराला एनर्जी मिळते.