आपल्या शरीरातील सर्व अवयवांप्रमाणेच शरीराचं कार्य सुरळीत राहण्यासाठी लिव्हर फार महत्त्वाचं कार्य पार पाडतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं, पचनप्रक्रीया सुरळीत होणं, रक्त शुद्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे डिटॉक्सीफिकेशन करण्याचं काम लिव्हर करतं. सध्याच्या धावपळीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमध्ये आरोग्याचा निरनिराळ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी लिव्हर फार महत्त्वाची भूमिका बजावतं. परंतु तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे म्हणा किंवा हेल्दी आहार न घेतल्यामुळे लिव्हरवर फार गंभीर परिणाम होतात.
अनेक लोकं व्यसनांच्या आहारी जातात. अशा लोकांमध्ये अनेकदा लिव्हर फेल्युअरची समस्या दिसून येते. पण एखाद्या निर्व्यसनी व्यक्तीलाही लिव्हर फेल्युअरची समस्या झाल्याचे आपण ऐकतो. त्याची अनेक कारणं असतात. जाणून घेऊयात लिव्हर फेल्युअरची समस्या उद्भवण्याची काही महत्त्वाची कारणं...
लिव्हर फेल्युअरची समस्या होण्याची कारणं :
- दूषित अन्न आणि पाण्याचं सेवन करणं
- मसालेदार आणि चटपटीत पदार्थांचं सेवन करणं
- शरीरात 'व्हिटॅमिन-बी' ची कमतरता असणं
- अॅन्टी-बायोटिक्सचं अति सेवन
- मलेरिया आणि टायफाइड
- चहा, कॉफी, जंक फूड इत्यादी पदार्थांचं अति सेवन
- सिगरेट, दारू यांसारखी व्यसनं करणं
- 6 तासांपेक्षा कमी झोप घेणं
आपण दैनंदिन जीवनात अनेक चुका करतो त्यामुळे अनेकदा लिव्हर फेल्युअरची समस्या उद्भवते. लिव्हरला सूज येणं, फॅटी लिव्हर यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागतो. औषधांव्यतिरिक्त अनेक घरगुती उपायांनीही तुम्ही लिव्हरच्या अनेक समस्यांपासून सुटका करून घेऊ शकता. जाणून घेऊयात लिव्हरचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी काही उपायांबाबत...
गाजर आणि आवळ्याचा ज्यूस :
लिव्हरचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि लिव्हरच्या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी गाजर आणि आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. दररोज नाश्त्यासोबत जर या ज्यूसचं सेवन केलं तर यामुळे फायदा होतो. हा ज्यूस लिव्हरला डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो. त्याचप्रमाणे लिव्हरला आलेली सूज कमी करण्याचेही काम करतो.
हळद :
हळदीमध्ये अॅन्टी-सेप्टिक आणि अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासोबतच हॅपिटायटस बी आणि सी या वायरसचा संक्रमण होण्यापासून बचाव होतो. दररोज दूधामध्ये हळद एकत्र करून प्यायल्याने लिव्हरचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.
आवळा :
एका संशोधनानुसार, आवळ्याचं सेवन लिव्हरच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय आहे. त्यामुळे दररोज व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असलेल्या आवळ्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
ग्रीन टी :
लिव्हरचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी रोज सकाळी अनोशापोटी एक कप ग्रीन टी पिणं लाभदायक ठरतं. यातील अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म लिव्हरमधील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे लिव्हरशी निगडीत सर्व आजारांपासून बचाव होतो.
आलं :
मसाल्याच्या पदार्थांमध्ये समावेश होणारं आलं आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांवरही वरदान ठरतं. आल्यामध्ये सल्फर कंपाउंड्स असतात. हे लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आवश्यक असणारे एंजाइम्स अॅक्टिव करण्याचे काम करते. त्याचसोबत आल्यामधील गुणधर्म पचनक्रिया मजबूत करण्याचं काम करतात.